गोसेखुर्द दोन वर्षांत पूर्ण करणार - महाजन

गोसेखुर्द दोन वर्षांत पूर्ण करणार - महाजन

नागपूर - अडीच लाख हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणण्याची क्षमता असलेला गोसेखुर्द प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासन जलसंपदामंत्री गिरीश  महाजन यांनी आज सभेत दिले. जून २०१८ पर्यंत चारही खोऱ्याच्या जलआराखड्याचे कामे पूर्ण होणार असून, २०१९ पर्यंत जलसंधारणाची राज्यातील कामे पूर्ण करण्यासंबंधी नियोजन  करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

सत्ताधाऱ्यांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. गोसेखुर्द प्रकल्पाची कामे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आतापर्यंत यावर ९ हजार ६०० कोटी खर्च केले असून, ८ हजार कोटी रुपये आणखी खर्च करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बेंबळा प्रकल्पाला ५०० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

केंद्राने राज्यातील ११२ प्रकल्पांना मान्यता दिली असून २०१९ पर्यंत राज्यातील जलसंधारणाची कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. विदर्भातील मामा तलावाचे निकष बदलले असून केवळ जुन्या प्रलंबित कामांनाच प्राधान्य देण्यात येत असून नवीन कामे केली जाणार नाही, असेही ते म्हणाले. भविष्यात ओपन कॅनलऐवजी जलवाहिनीने शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचविण्यात येईल. 

दोन वर्षात प्रत्येक शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. केंद्राने राज्याला १६ हजार ६०० कोटी रुपये जलसंधारणाच्या कामांसाठी दिले आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी देण्याचा प्रयत्न असल्याचे नमूद करीत त्यांनी जलसंधारण खात्याची यापूर्वीच्या सरकारने वाट लावल्याचा आरोप करीत राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार  यांच्यावर टीका केली.

अजित पवारांची महाजनांवर कोटी
गिरीश महाजन उत्तर देण्यास उभे राहताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरवरून कोटी केली. मंत्री महोदयांच्या कमरेला नियमित रिव्हॉल्व्हर असते. अध्यक्ष महाराज ती बाहेर काढण्यास सांगा. ‘ते चिडले तर आम्ही वर जाऊ’ अशी कोटी करताच  सभागृहात हास्याचे फव्वारे उडाले. 

बाजार समित्यांचा वापर शेतकऱ्यांसाठी व्हावा
चर्चेला उत्तर देताना पणन व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ३०७ पैकी केवळ ७१ बाजार समित्या शेतकऱ्यांचा शेतमाल साठवून ठेवण्यास मदत करीत आहे. सदस्यांनी त्यांच्या  अखत्यारित बाजार समित्यांचा वापर शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्यासाठी करावा, असे आवाहन केले. 

जलयुक्त शिवाराने वाढली पाण्याची पातळी
चर्चेला उत्तर देताना जलसंवर्धनमंत्री प्रा. राम शिंदे यांनी लोकसहभागातून जलयुक्त  शिवाराची कामे करण्यात येत असून, १६ लाख ८२ हजार टीएमसी पाणीसाठा झाल्याचे सांगितले. या योजनेमुळे पाण्याची क्षमता वाढलीच, शिवाय भूजल पातळीही वाढली आहे. टॅंकरचे प्रमाण कमी झाल्याचे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com