३३ आदिवासी संघटनांचा भव्य मोर्चा

नागपूर - आदीम जमातींच्या मोर्चात बिरसा मुंडा यांच्या वेशात सहभागी या तरुणाने लक्ष वेधून घेतले.
नागपूर - आदीम जमातींच्या मोर्चात बिरसा मुंडा यांच्या वेशात सहभागी या तरुणाने लक्ष वेधून घेतले.

नागपूर - काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चानंतर बुधवारी हलबा समाजबांधवांसह राज्यातील ३३ अन्यायग्रस्त आदिवासी जमातींनी विधानभवनावर मोर्चा काढून संघटित शक्तीचे प्रदर्शन घडविले. न्याय मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम असेल आणि न्याय मिळाला नाही, तर येत्या निवडणुकीत सत्ता उलथवून लावण्याचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला. विशेष म्हणजे हजारोंचा सहभाग असलेला हा मोर्चा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोर्चापेक्षा मोठा होता, असा दावा पोलिसांनी केला आहे.

राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे गोळीबार चौकातून मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड येथील समाजबांधवांनी मोर्चात सहभाग नोंदविला. आमदार विकास कुंभारे, विश्‍वनाथ आसई, ॲड. नंदा पराते, प्रकाश निमजे, धनंजय धापोडकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाला टेकडी रोड येथील स्टॉपिंग पॉइंटवर रोखून धरण्यात आले. तेथून रस्त्याच्या दुतर्फा अगदी मानस चौकापर्यंत जवळपास दीड किलोमीटरपर्यंतचा परिसर मोर्चेकऱ्यांनी व्यापला होता. पोलिस प्रशासन आणि शासनात धडकी भरविणारा हा मोर्चा नियंत्रित करण्यासाठी फोर्स वन आणि दंगानियंत्रक पथकासह चोख पोलिस बंदोबस्त परिसरात तैनात करण्यात आला. ‘समाजावर वर्षानुवर्षे होणारा अन्याय आता सहन करणार नाही. केवळ मतांसाठी समाजाच्या बाजूने बोलणाऱ्या राजकारणांच्या आश्‍वासनांना यापुढे बळी पडणार नाही. राजकारण्यांना पाठीशी घालणाऱ्या समाजातील व्यक्तींनाही यापुढे सहन करणार नाही,’ असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला. 

भाजपवर विश्‍वास नाही - विकास कुंभारे 
‘हलबांचा प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. तीन वर्षांचा काळ लोटूनही ते पूर्ण झाले नाही. आता भाजपवर विश्‍वास नाही. मोर्चा बघून सरकार घाबरले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रश्‍न सोडविण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. दिल्ली दरबारीही प्रश्‍न मार्गी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागेल. पण, तोवर स्वत: स्वस्थ बसणार नाही आणि पक्षालाही बसू देणार नाही. वर्षभरात प्रश्‍न सुटला नाही, तर राजीनामा देईन,’ असा इशारा आमदार विकास कुंभारे यांनी यावेळी दिला. 

शासकीय सेवेत हलबा कायम राहतील 
समाजाचे नेते विश्‍वनाथ आसई व इतरांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली. शासकीय सेवेत असलेल्या हलबा समाजातील एकाही व्यक्तीला कमी केले जाणार नाही, हलबा समाजाचे प्रश्‍न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती यावेळी नेतेमंडळींनी दिली. 

कुंभारेंना राजीनामा देण्याची मागणी 
विकास कुंभारे यांना समाजानेच आमदार बनविले. भारतीय जनता पक्ष तीन वर्षांमध्येही समाजाला न्याय मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळे आमदार विकास कुंभारे यांनी नैतिकतेच्या आधारावर आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी जाहीर मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. 

सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी 
काँग्रेस-राकाँतर्फे मंगळवारी काढण्यात आलेल्या जनआक्रोश, हल्लाबोल मोर्चामुळे शहरातील विविध भागांत ‘ट्रॅफिक जॅम’च्या समस्येचा सामना नागपूरकरांना करावा लागला. सलग दुसऱ्या दिवशी अन्यायग्रस्त आदिवासींतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामुळे मध्य नागपूरसह विधान भवनाकडे येणाऱ्या मार्गांवर वाहतूक कोंडी झाली होती.

प्रमुख मागण्या
सर्व अन्यायग्रस्त जमातींना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिले जावे. 
फारशा अटी न लादता वैधता प्रमाणपत्र दिले जावे.
मुख्यमंत्र्यांनी १७ डिसेंबर २०१७ रोजी अधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी व्हावी.
अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समित्या सामान्य प्रशासन            विभागाच्या नियंत्रणात आणाव्या.

मोर्चेकरी आक्रमक 
शिष्टमंडळ विधान भवनासाठी रवाना झाल्यानंतर महादेवराव जानकर पोहोचले. त्यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्ते आक्रमक झाले. ही आक्रमकता उशिरापर्यंत कायम राहिली. यामुळे सुरक्षा यंत्रणेला पुन्हा परिस्थिती नियंत्रणात घ्यावी लागली. पोलिस अधिकारी मोर्चेकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. तर दुसरीकडे काही जणांकडून चिथावणी दिली जात होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com