विदर्भवाद्यांच्या ढोल फुसका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नागपूर - केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यास वेगळा विदर्भ करण्यात येईल, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भवाद्यांना दिले होते. सत्तेत येऊन तीन वर्षे झाल्यानंतरही आश्‍वासनाची पूर्तता न झाल्याने विदर्भवाद्यांनी नागपुरात बुधवारी आंदोलन केले. गडकरी यांच्या वाड्यावर हा मोर्चा पोचण्यापूर्वीच पोलिसांनी अडविला. विदर्भवाद्यांच्या मोर्चाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने विदर्भवाद्यांचा ढोल फुसका ठरला.

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज शहीद चौकातील विदर्भ चंडिका मंदिरातून पूजा करून मोर्चा माजी आमदार वामनराव चटप, राम नेवले यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. हा मोर्चा गडकरींच्या वाड्यावर जाणार होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी मोर्चा अडविला. या वेळी संतप्त झालेल्या विदर्भवाद्यांनी विविध घोषणा देत भाजप सरकारचा निषेध केला.

पोलिसांनी विदर्भवादी नेत्यांना अडविल्यानंतर "जोपर्यंत नितीन गडकरी यांच्या वाड्यापर्यंत जाऊ देणार नाही,' तोपर्यंत हलणार नाही, असा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.