जलयुक्त शिवारानंतर जलयुक्त निवाराही हवा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

नागपूर - शहरातील पावसाचे पाणी वाहून जात असून, महापालिकेच्या उदासीनतेमुळे भविष्यात संत्रानगरीला पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्‍यता आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे नागरिकांनी पाठ फिरवली, तर अंमलबजावणीसाठी महापालिकाही विशेष प्रयत्न करताना दिसत नाही. याकडे लक्ष वेधत ‘सकाळ’ने रविवारी प्रकाशित केलेल्या वृत्तांवर सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली. यात अनेकांनी चांगल्या सूचना देतानाच महापालिकेच्या उदासीनतेवर ताशेरे ओढले.

शहरावर सध्या पाणीटंचाईचे संकट आहे. मात्र, पावसाळ्यात महापालिकेने पावसाचे पाणी जिरविण्याबाबत एकदाही मोहीम सुरू केली नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंग नागरिकांना बंधनकारक आहे. परंतु, यासंबंधात महापालिकेने आढावा घेतला नाही. ‘सकाळ’ने ‘पावसाचे पाणी जिरवण्यात महापालिका फेल’ या मथळ्यासह वृत्त प्रकाशित केले. नेटिझन्सनी या वृत्ताची व्हॉट्‌सॲप, फेसबुक, ट्‌विटरवर दखल घेत महापालिकेवर ताशेरे ओढले.

त्याचवेळी अनेकांकडून चांगल्या सूचनाही आल्या. डॉ. श्‍याम माधव धोंड यांनी राज्य शासनाच्या जलयुक्त शिवारानंतर महापालिकेने जलयुक्त  निवारा ही मोहीम सुरू करण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्याप्रमाणेच नरेश सक्‍तेल यांनीही घराघरांत पावसाचे पाणी जिरविण्यासाठी यंत्रणेवर भर देण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याच्या आवश्‍यकतेवर भर दिला. प्रा. शरद भांडारकर यांनी प्रभागांमध्ये लहान-लहान तळे करून पाणी साठवून भविष्याचे आतापासून नियोजन करण्याची गरज व्यक्त केली.

नागरिकांनीसुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रतिसाद देणे गरजेचे आहे. शासनाने पाणी स्रोतांची माहिती संकलित करून  पाण्याचे ऑडिट करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

महापौरांची दंडाची घोषणाही हवेत
२०१५ मध्ये तत्कालीन महापौर प्रवीण दटके यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी घोषणा केली होती. या घोषणेचे काय झाले, असा प्रश्‍न विवेक तायवाडे या तरुणाने उपस्थित केला. अधिकारी महापौरांचेच निर्देश ऐकत नाही, त्यामुळे समस्या कायम राहतात, असेही तायवाडे यांनी नमूद केले.