वृक्षारोपणासाठी चला ‘जपानी गार्डन’ला!

वृक्षारोपणासाठी चला ‘जपानी गार्डन’ला!

एक ते सात जुलैपर्यंत वृक्षलागवड मोहीम - वनविभागाचा आगळावेगळा उपक्रम 
नागपूर - वृक्षलागवड मोहिमेत सहभागी व्हायचे आहे. मात्र, जागा नाही, झाडेही नाहीत, असा प्रश्‍न कोणाला पडला असेल तर चिंता करू नका. तुमची वृक्षलागवडीची हौस आणि वृक्षांची सोय वनविभाग करून देईल. त्यासाठी फक्त हवी तुमची झाड विकत घ्यायची आणि खड्डा करण्याची तयारी हवी. तर मग चला सिव्हिल लाइन्समधील जपानी गार्डनमध्ये एक ते सात जुलैदरम्यान वृक्ष खरेदी करा व व्हा मोहिमेत सहभागी. वृक्षलागवडीनंतर त्याची नोंद फक्त ‘माय प्लान्ट’ या ॲपमध्ये करावी, असे आवाहन उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी केले आहे.  

जिल्ह्यात १५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत १७ लाख खड्ड्यांची नोंदणी ऑनलाइन करण्यात आली. एक ते सात जुलै या कालावधीत शहरासह जिल्ह्यातील ३५ वनविभागांच्या जागांवर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. वृक्षारोपण मोहिमेचे उद्‌घाटन हिंगणा रोडवरील राज्य राखीव दल शिबिर परिसरात सकाळी नऊ वाजता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल. दुसरा कार्यक्रम कोराडीलगतच्या परिसरात असून, वीज प्रकल्पाच्या परिसराला वृक्षाच्छादित करण्याचा संकल्प आहे.

दोन जुलैला रविवार असून, सर्वच अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केले जाईल. तीन जुलैला साडेचार वाजता विमानतळ प्राधिकरण परिसर, चार जुलैला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा अमरावती रोडवरील परिसर, पाच जुलैला सेमिनरी हिल्स येथेही वृक्षारोपण होईल. दोन हजार फळझाडे, वड, पिंपळ आणि कडुलिंबही येथे लावण्यात येणार असून, शहरात नवीन ‘ऑक्‍सिजन पार्क’ निर्मितीचा संकल्प आहे. सहा जुलैला वनमंत्री सुधीर मुनगंटवार यांच्या हस्ते मिहान परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आहे. त्यानंतर रेल्वे आणि वनविभागाने केलेल्या करारानुसार रेल्वेच्या जागेवर प्रतीकात्मकरीत्या वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील सर्वच रेल्वेच्या जागांवर वृक्षलागवडीच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. वृक्षारोपणाच्या मोहिमेचा समारोप हिंगणा रोडववरील सीआरपीएफच्या प्रांगणात होणार आहे. अंबाझरी परिक्षेत्रातील पायवटीच्या शेजारी ३५०० फळझाडे लावली जाणार आहेत. या परिसरातील जैवविविधता वाढविण्याचा संकल्प आहे. पक्ष्यांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली. त्यात सृष्टी पर्यावरण संस्था, युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया, वनविभाग पेन्शनर्स असोसिएशन, नागपूर युनिट, किडस फॉर टायगर, कासा यासह इतरही संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

बैठकीला उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपसंचालक मोहन ढेरे, सेवानिवृत्त वनाधिकारी किशोर मिश्रीकोटकर, सहायक वनसंरक्षक विशाल बोऱ्हाडे, मानद वन्यजीवरक्षक कुंदन हाते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com