अंनिसचे 20 जुलैपासून "जबाब दो' आंदोलन - डॉ. हमीद दाभोलकर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

नागपूर - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला येत्या 20 ऑगस्टला चार वर्षे पूर्ण होत आहेत. या चार वर्षांत राज्य सरकारला तपास करण्यात व आरोपींना गजाआड करण्यात यश आलेले नाही. काही आरोपींविरुद्ध सबळ पुरावे असतानाही कोणतीही कारवाई केली जात नाही. राज्य सरकारला याचे उत्तर मागण्यासाठी येत्या 20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान "जबाब दो' आंदोलन राज्यभरात पुकारण्यात येणार असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

नागपुरात त्यांनी "सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी संवाद साधताना ते म्हणाले, की डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे आहे. यात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळालेले आहेत. काही आरोपी फरार आहेत. त्यांना शोधण्यात तपास यंत्रणेला अपयश आले आहे. गोविंद पानसरे व डॉ. दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात सारखेच आरोपी असल्याचे तपास यंत्रणेच्या लक्षात आले आहे. तरीही पोलिस यंत्रणा व राज्य सरकार पुढे कारवाई करीत नाही. याचे उत्तर मागण्यासाठी हे आंदोलन राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

"मानस मैत्री'वर कार्यशाळा
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मानसिक आधार देण्यासाठी मानस मैत्री कार्यशाळा सुरू करण्यात येणार आहे. कर्ता पुरुष निघून गेल्यानंतर कुटुंबांच्या नशीबी आयुष्यभर दुःखाची साथ असते. कुटुंब वैफल्यग्रस्त होते. अशा शेतकरी कुटुंबाला मानसिक आधार देत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्या कुटुंबाला भावनिक आधार देण्यासाठी येत्या 15 जुलैला वर्धा येथे कार्यशाळेला सुरवात होणार आहे. स्वामिनाथन फाउंडेशनच्या सहकार्याने ही कार्यशाळा होणार आहे.