नागपूरची कौशिकी ‘मिस इंडिया सुपर टॅलेंट’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नागपूर - बंगळुरू येथे अलीकडेच झालेल्या ‘मिस इंडिया सुपर टॅलेंट’ स्पर्धेत नागपूरची कौशिकी नाशिककर हिने बाजी मारली असून तिच्या यशामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. गेल्या काही वर्षांपासून नागपूरच्या सौंदर्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत असलेला नावलौकिक आता कौतुकाचा विषय ठरत आहे.

नागपूर - बंगळुरू येथे अलीकडेच झालेल्या ‘मिस इंडिया सुपर टॅलेंट’ स्पर्धेत नागपूरची कौशिकी नाशिककर हिने बाजी मारली असून तिच्या यशामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. गेल्या काही वर्षांपासून नागपूरच्या सौंदर्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत असलेला नावलौकिक आता कौतुकाचा विषय ठरत आहे.

बंगळुरू येथील दावणगिरीला जेनेसीस रिसोर्टमध्ये ‘मिस इंडिया सुपर टॅलेंट - सिझन ९’ ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ‘मिस परफेक्‍ट’ या गटात कौशिकीने विजेतेपद पटकावले. देशभरातील शेकडो सौंदर्यवतींनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. देशाच्या विविध भागांमध्ये जवळपास सहा ठिकाणी या स्पर्धेसाठी ऑडिशन्स घेण्यात आल्या. त्यापैकी १५ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. 

या पंधरा स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत झाली. यात सौंदर्य, कॅटवॉक, सामान्यज्ञान आदी गोष्टींची चाचणी घेण्यात आली. यासाठी चार दिवस सर्व स्पर्धकांकडून कसून तयारी करून घेण्यात आली. जिद्द, मेहनत, कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर कौशिकीने हा खिताब पटकावला. 

महाल येथे निवडणुकीसाठी आवश्‍यक साहित्य निर्मितीचा व्यवसाय करणारे नीलेश नाशिककर यांची ती कन्या आहे. दत्ता मेघे पॉलिटेक्‍निकमध्ये कॉम्प्युटर शाखेची ती  अंतिम वर्षाची विद्यार्थिनी आहे. यापूर्वीही कौशिकीने विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले  आहे. ‘नागपूर क्वीन’, ‘मिस भंडारा’, ‘मिस वर्धा’, ‘मिस महाराष्ट्र आयकॉन-ब्युटीफूल’ यासारख्या अनेक स्पर्धांमध्ये तिने आपली छाप सोडली आहे. 

आता राष्ट्रीय पातळीवर ‘परफेक्‍ट १०’ हा पुरस्कार पटकाविल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये नशीब आजमावण्याचा तिचा मार्ग खुला झाला आहे. 

अखिला केथीरेड्डी (मिस एशिया यूएस), तेजस्विनी शर्मा (वर्ल्ड सुपर मॉडेल साऊथ एशिया), जोशिता अनोला (मिस साऊथ एशिया), निमिका रत्नाकर (मिस इंडिया सुपर टॅलेंट), आनंद गुप्ता (इंटरनॅशनल डिझायनर), नरेश दुदानी (बॉलीवूड निर्माते), प्रतिमा तोतला (फॅशन आयकॉन), नीलिमा कपुरिया (मिसेस इंडिया गोल्डन हार्ट) या दिग्गजांच्या हस्ते कौशिकीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.