'महाबीज'चे सोयाबीन उगवलेच नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

हवामान विभागाचा चुकलेला अंदाज आणि पावसाचा पडलेला खंड याचा पेरण्यावर परिणाम झाला. त्यामुळेच सोयाबीन बियाणे उगवले नाही. कृषी विभाग आणि प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर यासंबंधी योग्य कारवाई केली जाईल.
- प्रफुल्ल लहाने, महाव्यवस्थापक गुणवत्ता नियंत्रक महाबीज.

विदर्भातील शेतकऱ्यांच्या तक्रारी
नागपूर - आधी हवामान विभागाच्या अंदाजाने आणि आता "महाबीज'च्या सोयाबीन बियाण्याने बळिराजाचा घात केल्याने खरीप हंगामापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. आधीच नैसर्गिक संकटानी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना मानवनिर्मित संकटानांही तोंड द्यावे लागत असल्याने तो हतबल झाल्याचे चित्र विदर्भात आहे.

महाबीज ही सरकारी कंपनी असल्याने शेतकऱ्यांचा त्यावर अधिक विश्‍वास आहे. याच विश्‍वासातून "महाबीज'चे बियाणे खरेदी करून खरिपात पेरणी केली. परंतु "9560', "9305' या प्रजातीचे सोयाबीनचे बियाणे केवळ 30 टक्केच उगविल्याने शेतकऱ्यांना हंगामापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. हा प्रकार केवळ नागपूर विभागातील नाही तर संपूर्ण विदर्भातून यासंबंधीच्या तक्रारी दररोज कृषी विभागाकडे येत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. जून महिन्यात पेरणी योग्य पाऊस झाल्याने या दोन्ही प्रजातीच्या सोयाबीन बियाणाची शेतकऱ्यांनी पेरणी केली. काही शेतकऱ्यांकडील बियाणेच उगविले नाही, तर काही शेतकऱ्यांकडे 30 टक्केच बियाणे उगवले. वर्धा, नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ या जिल्ह्यांतून गेल्या चार-पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात तक्रारी कृषी विभागाकडे आल्या. कृषी विभागाच्या पथकाने आणि तज्ज्ञांनी शेतात भेट देऊन बियाण्याची पाहणी केली. हे पथक या संदर्भातील अहवाल देणार असून यातील तथ्य बाहेर येणार आहे.

सलग दुसऱ्या वर्षी तक्रारी
गेल्या वर्षी खरीप हंगामात याच दोन्ही प्रजातीचे सोयाबीन बियाण्यांनी दगा दिला होता. त्यासंबंधीच्या तक्रारी "महाबीज' आणि कृषी विभागाकडे आल्या होत्या. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यानंतर "महाबीज'च्या नागपूर विभागातील दोनशे शेतकऱ्यांना बियाण्यांची नुकसानभरपाई दिली होती. यंदाही हीच परिस्थिती कायम असल्याने "महाबीज'च्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.