ब्लॅकमेल करणाऱ्या ‘वराती’वर मकोका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

नागपूर - तरुणींच्या माध्यमातून पुरुषांकडून खंडणी गोळा करणाऱ्या तसेच बदनामीची धमकी देऊन ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीला सत्र न्यायालयाने मंगळवारी मकोका व इतर कलमांखाली दोषी ठरविले. या टोळीविरुद्ध तब्बल ४१ लोकांनी न्यायालयात साक्ष दिली. 

नागपूर - तरुणींच्या माध्यमातून पुरुषांकडून खंडणी गोळा करणाऱ्या तसेच बदनामीची धमकी देऊन ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीला सत्र न्यायालयाने मंगळवारी मकोका व इतर कलमांखाली दोषी ठरविले. या टोळीविरुद्ध तब्बल ४१ लोकांनी न्यायालयात साक्ष दिली. 

सर्वच आरोपींना मकोकाअंतर्गत प्रत्येकी १५ लाख म्हणजेच एकूण ६० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. टोळीचा म्होरक्‍या दीपक आवळे याला जन्मठेपेची तर इतरांना प्रत्येकी १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दीपक आवळे (३०, वैशालीनगर), दिनेश नागदेवे (४२, इंदोरा चौक), सुनीता किशोर बुलकर (३०, वैशालीनगर), सुमीत वासुदेव फुलझेले (२८, कीर्तीनगर) आणि पुष्पा निखारे (४५,रा. तांडापेठ) अशी या आरोपींची नावे आहेत. यातील दिनेश नागदेवे याचा आरोपपत्र दाखल होण्यापूर्वीच कारागृहात मृत्यू झाला. या प्रकरणातील पीडित सिद्धार्थ खोब्रागडे यांनी मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल करण्यासाठी आरोपींनी एका २० वर्षीय तरुणीची मदत घेतली. तरुणीला उच्चशिक्षणासाठी २० हजार रुपयांची आवश्‍यकता होती. १७ मार्चला या तरुणीने सिद्धार्थ यांना मानकापूर भागात परिसरात भेटायला बोलाविले व त्यांना जाळ्यात अडकविले. २० मार्चला तरुणीचा वाढदिवस असल्याचे कारण पुढे करण्यात आले. टोळीचा म्होरक्‍या आवळे व तरुणीने नवा नकाशा भागात भाड्याने खोली घेतली.

काही वेळाताच आवळे व त्याचे साथीदार खोलीत घुसले. ‘तू आमच्या मुलीवर अत्याचार करीत आहे, तुला धडा शिकवतो, पोलिसांत तक्रार दाखल करतो’, अशी धमकी देत आवळेने सिद्धार्थ यांना मारहाण केली. सिद्धार्थ यांच्या एटीएममधून ७० हजार रुपये काढले. तसेच त्यांच्याकडून तीन लाख रुपयांचा धनादेश स्वाक्षरी करून घेतला आणि तो वठवलाही. याप्रकरणी सिद्धार्थ यांनी मानकापूर पोलिसांकडे तक्रार केली. संबंधित तरुणीला समोर आणल्यावर तिच्या खांद्यावर बंदूक ठेवून आरोपींनी आपली पोळी शेकल्याचे लक्षात आले. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकरणी आरोपींविरुद्ध मकोकाअंतर्गत गुन्हे दाखल करून तपासाअंती आरोपपत्र सादर करण्यात आले. विशेष सरकारी वकील विजय कोल्हे यांनी या प्रकरणी सरकारची बाजू मांडली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर जिल्हा व सत्र न्यायासलयाचे न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी आरोपींना शिक्षा ठोठावली.

Web Title: nagpur vidarbha news makoka crime blackmail