मनोज जयस्वाल यांना अटक

मनोज जयस्वाल यांना अटक

बॅंकांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयची कारवाई
नागपूर - लोकमत समूहाचे प्रमुख तथा माजी खासदार विजय दर्डा यांचे खास मित्र आणि कोळसा गैरव्यवहारातील सहआरोपी मनोज जयस्वाल यांना त्यांचे चिरंजीव अभिषेक यांच्यासह कोलकता येथे अटक करण्यात आल्यामुळे नागपुरातील औद्योगिक विश्‍वात खळबळ उडाली आहे. जयस्वाल यांच्या अभिजित समूहाच्या विविध कंपन्यांनी वीसहून अधिक बॅंकांना 11 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा गंडा घातल्याची माहिती पुढे आली असून, याच प्रकरणात त्यांना "सीबीआय'ने मंगळवारी अटक केली.

कोळसा गैरव्यवहारात विजय दर्डा यांच्यासमवेत मनोज जयस्वाल हे सहआरोपी आहेत. त्या दोघांची खास मैत्री उद्योग व राजकीय वर्तुळात प्रसिद्ध आहे. दर्डा यांच्या जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. या कंपनीच्या नावावर छत्तीसगडमध्ये जयस्वालने "कोल ब्लॉक' घेतला होता. याच कोळसा गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने नेमलेल्या विशेष सीबीआय पथकाद्वारे मनोज जयस्वाल यांची चौकशी केली जात आहे. विजय दर्डा यांचीही चौकशी कोळसा गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयतर्फेच केली जात आहे.

"अभिजित ग्रुप'चे प्रवर्तक मनोज आणि अभिषेक जयस्वाल यांच्यासह कॅनरा बॅंकेचे माजी उपसरव्यवस्थापक टी. एल. पै यांच्यावर कॅनरा व विजया या बॅंकांचे 290 कोटी रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली. या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असून, अभिजित समूहाच्या 13 कंपन्यांनी 20 बॅंका व अन्य वित्तीय संस्थांकडून कर्जे घेतली. पुढे याचेच रूपांतर "एनपीए'मध्ये करण्यात आले. आजमितीस थकीत कर्जाची रक्कम ही अकरा हजार कोटी रुपये एवढी आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींविरोधात गुन्हेगारी कटकारस्थान आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज जयस्वाल यांचे सर्वच राजकीय पक्षातील बड्या नेत्यांशी संबंध आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जयस्वाल, कमलनाथ यांच्यासह भाजपच्या मोठ्या नेत्यांशीही त्यांची जवळीक आहे. उद्योगपती मनोज जयस्वाल हे नागपूरमधील बडे प्रस्थ मानले जात असे. कोळसा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर मात्र त्यांचे उद्योग वर्तुळातील वजन व वावर कमी झाला. अभिजित समूहांतर्गत त्यांच्या अनेक कंपन्या आहेत. जेएसएल इन्फ्रास्ट्रक्‍चर, एएमआर आयर्न अँड स्टील्स या कंपन्यांची रस्ते विकास, ऊर्जा, स्टील, लोखंड आणि खनिज उत्खनन क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे. नागपूरच्या मिहान प्रकल्पात त्यांचा कॅप्टिव्ह पॉवर प्लॅंट होता. तो आता बंद पडला आहे.

विमान लिलावात
पाच वर्षांपूर्वी नागपूरजवळील सुराबर्डी येथील लॉनवर मनोज जयस्वाल यांच्या मुलीच्या लग्नाचे जंगी रिसेप्शन झाले होते. त्या प्रसंगी अनेक बडे राजकीय नेते, बॅंकांच्या अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. जयस्वाल यांच्या मालकीचे 10 आसनी विमानसुद्धा होते. ते त्यांनी आयडीबीआय बॅंकेतून कर्ज घेऊन विकत घेतले होते. स्वतःचे विमान वापरणारे मनोज जयस्वाल विदर्भातील पहिले उद्योगपती ठरले होते. कोळसा गैरव्यवहारात अडचणीत आल्यानंतर त्यांनी विमानाचा वापर थांबवला. यानंतर ते अनेक वर्षांपासून नागपूर विमानतळावर पडून होते. विमानाचे पार्किंग- देखभाल भाडे आणि कर्जाची थकबाकी यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण आणि आयडीबीआयने ते लिलावात काढले होते. लिलावात त्याची विक्री झाल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com