मेडिकलचे कोबाल्ट, मेयोचे सीटीस्कॅन कालबाह्य

Meyo-Hospital
Meyo-Hospital

नागपूर - दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असलेले नागपूर एकमेव उपराजधानीचे शहर आहे. परंतु, येथील मेडिकलमधील कोबाल्ट युनिट कालबाह्य ठरले आहे. हीच स्थिती मेयोत आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सीटी स्कॅनचे आयुष्य संपले आहे. नवीन यंत्रांची मागणी करूनही शासनाकडून पुरवठा होत नाही. मात्र, ज्या यंत्राची मागणी केली जात नाही त्या यंत्रांचा पुरवठा केला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. 

मेडिकलच्या कर्करुग्ण विभागात (रेडिओग्राफी) कालबाह्य कोबाल्ट युनिटवर कॅन्सरग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. ही गंभीर बाब असून, कॅन्सर इस्टिट्यूटच्या उभारणीला अद्याप सुरुवात झालेली नाही. मेडिकलमध्ये केंद्र शासनाच्या खनिकर्म मंत्रालयाकडून झालेल्या चार कोटींच्या मदतीने येथील कॅन्सर विभागात २००५ साली ‘कोबाल्ट युनिट’ लावण्यात आले. यासोबतच ‘ब्रेकी थेरपी’ यंत्र लावले. आता कोबाल्ट आणि ब्रेकी यंत्र कालबाह्य झाले आहेत. ७ वर्षांपासून ‘लिनिअर एक्‍सिनिलेटर’ची मागणी असतानाही या यंत्राच्या खरेदीच्या प्रस्तावाला वैद्यकीय संचालनालयाकडून केराची टोपली दाखवली जाते. विदर्भातील कॅन्सरग्रस्तांसह मध्य भारतातील छत्तीसगढ, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील २० ते २५ टक्के कॅन्सरग्रस्तांच्या उपचाराचा भार मेडिकलवर आहे.

न मागता मिळाले हायपरबेरिक 
मेडिकलमध्ये अनेक यंत्र कालबाह्य आहेत. नवीन यंत्राचा प्रस्ताव सादर केल्यानंतरही हिरवी झेंडी मिळत नाही. मात्र, काही वर्षांपूर्वी जळीत व सर्जरीच्या रुग्णांसाठी वरदान ठरणारे एक ते सव्वा कोटींचे हायपरबेरिक यंत्र न मागताच मिळाले. विशेष असे की, कंपनीकडून वारंवार पैशाची  मागणी केली जात होती. सध्या हे यंत्र पांढरा हत्ती बनून रिकव्हरी रूममध्ये आहे, हे विशेष.

सीटी स्कॅनचे आयुष्य संपले
मेयोत एमआरआयअभावी अनेक संकट उभी आहेत. मात्र, एमआरआय अद्याप मिळाले नाही. जे सीटी स्कॅन यंत्र आहे. तेही कालबाह्य झाले आहे. विद्यार्थ्यांना सीटी स्कॅनसंदर्भात कौशल्याचे धडे देताना किमान ६४ आणि कमाल १२८ स्लाईस निघतील असे अद्ययावत सिटीस्कॅन यंत्र हवे  असा वैद्यक परिषदेचा निकष सांगतो. मात्र, येथे निकषाला हरताळ फासला आहे. सध्या उपलब्ध सिटी स्कॅन १६ वर्षे जुने आहे. एकावेळी जेमतेम २ स्लाइस काढण्याची क्षमता आहे. आयुष्य संपल्यामुळे वारंवार सीटी स्कॅन बंद पडते. यामुळे निदानाच्या अचूकतेवर प्रश्‍नचिन्ह आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com