मेट्रो रेल्वेच्या जलदगती पथकाची वृद्धाला मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नागपूर - मेट्रो रेल्वेची कामे सुरू असल्याने अनेक भागांत रस्ता अरुंद झाला असून, अपघाताची शक्‍यता बळावली आहे. त्यामुळे महामेट्रोने कुठलाही अपघात होऊ नये, झाल्यास अपघातातील जखमींना तत्काळ उपचार मिळावे, यासाठी जलदगती पथक तयार केले आहे. या पथकाने शनिवारी सकाळी अजनी चौकात झालेल्या अपघातात जखमी वृद्धाला मेडिकलमध्ये दाखल करीत त्वरीत उपचाराची सुविधा केली. 

शहरात मेट्रो रेल्वेची कामे सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी महामेट्रो सर्वच प्रयत्न करीत आहे. नागरिक व कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या महामेट्रोने जलदगती पथकही तयार केले. जलदगती पथक मेट्रो रेल्वेच्या कामावर २४ तास नजर ठेवत आहे. अपघात झाल्यास संबंधितांना तत्काळ मदत करण्याची जबाबदारी या पथकावर आहे. अरुंद रस्ते, पिलर, स्टेशनच्या बांधकामावर अपघात होऊ नये, याकरिताही हे पथक काम करीत आहे. सकाळी सव्वासातच्या सुमारास अजनी चौकात ७४ वर्षीय अंबादास तायडे यांचा अपघात झाला.

मेट्रोच्या कंट्रोल रूमला तत्काळ या घटनेची माहिती देण्यात आली. ही सूचना मिळताच पॅट्रोलिंग करीत असलेले जलदगती पथकातील जवानांनी तत्काळ घटनस्थळ गाठले आणि अंबादास तायडे यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल केले. एवढेच नव्हे या पथकातील जवानांनी तायडे यांच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली. अंबादास तायडे यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांचे पुत्र नितीन तायडे यांनी या पथकाचे आभार मानले. यापूर्वीही अजनी चौकात स्टार बसच्या धडकेत जखमी झालेल्या दाम्पत्याला या पथकाने खासगी रुग्णालयात दाखल केले होते.