मेट्रो अत्याधुनिक, उत्पन्नासाठी हवा वेगळा आराखडा

राजेश प्रायकर
बुधवार, 26 जुलै 2017

जयपूर मेट्रोपासून धडा घेण्याची गरज - प्रवासी संख्येतही वाढीचेही आव्हान 
नागपूर - नागपूर मेट्रो तांत्रिकदृष्ट्या देशातील मेट्रोच्या तुलनेत अत्याधुनिक आहे. परंतु, २०१५ पासून सुरू झालेल्या जयपूर मेट्रोला वार्षिक तीस कोटींचे नुकसान सोसावे लागत असल्याचे तेथील प्रकल्प संचालक अश्‍विनी सक्‍सेना यांनी स्पष्ट केले. उत्पन्नाच्या इतर साधनांवर जयपूर मेट्रो आता लक्ष केंद्रित करीत आहे. त्यामुळे नागपूर मेट्रोने भविष्यातील मोठे नुकसान टाळण्यासाठी आतापासून उत्पन्नाकरिता वेगळा कृती आराखडा तयार गरज निर्माण झाली आहे. 

जयपूर मेट्रोपासून धडा घेण्याची गरज - प्रवासी संख्येतही वाढीचेही आव्हान 
नागपूर - नागपूर मेट्रो तांत्रिकदृष्ट्या देशातील मेट्रोच्या तुलनेत अत्याधुनिक आहे. परंतु, २०१५ पासून सुरू झालेल्या जयपूर मेट्रोला वार्षिक तीस कोटींचे नुकसान सोसावे लागत असल्याचे तेथील प्रकल्प संचालक अश्‍विनी सक्‍सेना यांनी स्पष्ट केले. उत्पन्नाच्या इतर साधनांवर जयपूर मेट्रो आता लक्ष केंद्रित करीत आहे. त्यामुळे नागपूर मेट्रोने भविष्यातील मोठे नुकसान टाळण्यासाठी आतापासून उत्पन्नाकरिता वेगळा कृती आराखडा तयार गरज निर्माण झाली आहे. 

नुकताच महामेट्रोतर्फे जयपूर मेट्रो रेल्वेचा दौरा आयोजित केला. या दौऱ्यात जयपूर मेट्रोची क्षमता, तेथील नागरिकांचा मेट्रोला प्रतिसाद, एकूण खर्च, दररोजचे उत्पन्न, उत्पन्नाचे नवे साधने, जयपूर मेट्रोचा विस्तारित टप्पा, दाटीवाटीच्या क्षेत्रातून प्रस्तावित भूमिगत मेट्रो मार्ग आदींवर  प्रकल्प संचालक अश्‍विनी सक्‍सेना, कार्पोरेट अफेअर्स संचालक राजेश अग्रवाल, वित्त संचालक ब्रीजभूषण शर्मा, मेट्रो रेल्वे ऑपरेशन व्यवस्थापक शरद श्रीवास्तव यांनी प्रकाश टाकला. जून २०१५ पासून सुरू झालेली मेट्रो रेल्वे दोन वर्षांनंतरही तोट्यात चालविली जात आहे. पहिल्या टप्प्यात १२ पैकी ९ किमीचे काम पूर्ण झाले असून, मानसरोवर ते चांदपूलपर्यंत ही मेट्रो सुरू आहे. यावर २०४४ कोटींचा खर्च झाला आहे. आता मेट्रो धावत असून कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वेतन, मेट्रो रेल्वेसाठी लागणारी वीज, व्यवस्थापन, देखभाल यावर वर्षाला ४३ कोटींचा खर्च येत असून केवळ प्रवासी तिकिट व काही प्रमाणात जाहिरातून केवळ १३ कोटींचेच उत्पन्न होत असल्याचे सक्‍सेना यांनी नमूद केले. ३० कोटींचे नुकसान दरवर्षी होत असून ते भरून काढण्यासाठी जयपुरातील नागरिकांवर राजस्थान सरकारने हरित कर आकारला असून जमीन व्यवहारातील स्टॅम्प ड्युटीवरही सरचार्ज आकारण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर मेट्रोने  यापासून धडा घेत केवळ प्रवासी तिकिटाच्या उत्पन्नावर अवलंबून न राहता मेट्रो स्टेशनवर  व्यापारसंकुल, जाहिरातीतून उत्पन्नाबाबत नवा आराखडा तयार करण्याची गरज असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नागपूर मेट्रोसाठी उभारण्यात आलेल्या पिलरवर तसेच मार्गावरही जाहिरातून मोठ्या उत्पन्न नाकारता येत नाही. यासाठी आतापासून कृती आराखडा तयार केल्यास तोटा टाळणे शक्‍य होणार आहे.

‘प्रॉपर्टी डेव्हलपमेंट’ आदर्श 
जयपूर मेट्रोच्या स्टेशनवर कुठलेही दुकान आढळून आले नाही. मुळात स्टेशनवरील मोकळ्या जागेचा विकास करून तेथे दुकाने किंवा ऑफिसेससाठी जागा भाड्याने देण्याकडे आता त्यांचे  लक्ष गेले. मात्र, नागपूर मेट्रोने आतापासूनच स्टेशनवरील दुकानांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केल्यास प्रकल्पासाठीही मोठा निधी उभा राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. जयपूर मेट्रोच्या ‘प्रॉपर्टी डेव्हलपमेंट’चा मॉडेल नागपूर मेट्रोच्या उत्पन्नाचा मार्ग ठरू शकतो. 
 

स्मार्ट कार्डमधूनही उत्पन्न
जयपूर मेट्रोने प्रवाशांसाठी स्मार्ट कार्डचा वापर सुरू केला. या स्मार्ट कार्डला रिचार्ज करून नागरिक प्रवास करतात. या स्मार्ट कार्डवर लहान जाहिरातींच्या माध्यमातूनही मोठ्या उत्पन्नाची सुविधा नागपूर मेट्रोला करता येईल. जयपूर मेट्रोने याबाबत पुढाकार घेतला असून, बॅंकांच्या जाहिराती त्यातून करण्यात येणार आहे. ही संकल्पनाही विलंबाने सुचली असली तरी नागपूरसाठी ती मार्गदर्शक ठरण्याची शक्‍यता आहे.  

खर्च सारखाच, पण प्रवासी संख्या कमी 
जयपूर मेट्रोने एक कोच ८.५० कोटींत खरेदी केली. एका ट्रेनला चार कोच असून त्याचा खर्च ३४ कोटी आहे. चार कोच असल्यामुळे प्रवासी संख्याही अधिक आहे. मात्र, नागपूर मेट्रोला  तीन कोच असून त्याचा खर्च ३५ ते ३६ कोटीइतका आहे. मात्र, तीन कोच असल्यामुळे तुलनेने कमी प्रवासी यातून प्रवास करतील. नागपूर मेट्रोला जास्त प्रवासी संख्या वाढविण्याची आताच  संधी आहे.  

वेगवान नागपूर मेट्रो 
जयपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनची स्थापना १ जानेवारी २०१० ला झाली. प्रत्यक्षात ट्रायल सप्टेंबर २०१३ मध्ये घेण्यात आली. अर्थात साडेतीन वर्षांनंतर मेट्रो रेल्वेची ट्रायल घेण्यात आली. नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशनची स्थापना १८ फेब्रुवारी २०१५ ला झाली. पुढील महिन्यात १५ ऑगस्टदरम्यान ट्रायल घेण्याची तयारी सुरू आहे. अर्थात अडीच वर्षांत ट्रायल घेतल्यास नागपूर मेट्रोच्या गतीची कल्पना येते.