परक्‍यांपेक्षा स्वकीयांचीच जास्त भीती

परक्‍यांपेक्षा स्वकीयांचीच जास्त भीती

नागपूर - शहरात बालक व अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होणे ही चिंतेची बाब आहे. ‘सकाळ’ने ‘अब तक ५६’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच सोशल मीडियावर नेटिझन्सनी आरोपींवर आगपाखड केली. अनेकांनी परक्‍यांपेक्षा स्वयकीयांपासूनच धोका असल्याची भावना व्यक्‍त केली. अनेक पालक घरातच ‘गुड टच ॲण्ड बॅड टच’ याबाबत प्रशिक्षण देत आहेत. लहान मुला-मुलींमध्ये आप्तस्वकीयांची दहशत निर्माण झाली आहे.

लहान मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याची मोठी सामाजिक समस्या समाजासमोर उभी ठाकली आहे. परक्‍यांपेक्षा शेजारी, सख्खे नातेवाईक, आप्तस्वकीयांचा आरोपींमध्ये मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यासोबतच स्कूलबस-व्हॅनचे चालक-वाहक, ऑटोचालक, रिक्षाचालक व प्रियकरांचाही समावेश आहे. आतापर्यंत १०९ पैकी ५६ अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची नोंद गुन्हे शाखेत केली आहे. यामध्ये नातेवाइकांचा समावेश सर्वाधिक असल्याने समाजात परक्‍यांपासून नव्हे, तर स्वकीयांपासूनच धोका असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच जागृत होणे गरजेचे आहे. या वृत्तांवर अनेक पालक, विद्यार्थी आणि युवा वर्गाने प्रतिक्रिया व्यक्‍त करीत मनातील खदखद व्यक्‍त केली.

घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवावे. मुलींच्या प्रत्येक प्रश्‍नाचे किंवा समस्येचे समाधान होईल याकडे पालकांनी लक्ष द्यावे. मुलांकडे दुर्लक्ष न करता आपुलकीने विचारपूस करावी. प्रेम व लैंगिक आकर्षण या बाबतीत माहिती पालकांनी पाल्यांना सांगावी.
- पूजा जैन

मुलींना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण द्यावे. छेडखानी आणि लाड यामधील फरक समजून सांगावा. कुणी वाईट नजर टाकल्यास त्याचा प्रतिकार कसा करावा याबाबत सूचना पालकांनी कराव्यात. अशा घटनांकडे पालकांनीच गंभीर होणे गरजेचे आहे. 
- स्मिता देऊळकर

पालकांनी पाल्यांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करणे गरजेचे आहे. मुलांच्या मनात पालकांच्या भीतीऐवजी प्रेम दिसणे महत्त्वाचे आहे. विशेषतः मुलींबाबत आईने संवेदनशील असणे गरजेचे आहे. आईने मुलींशी मैत्रीपूर्ण व्यवहार केल्यास नक्‍कीच मुली वाममार्गाकडे न वळता सुमार्गाकडे वळतील.
- सूरज दहीकर

पालकांनी लैंगिक शिक्षण देण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. पाल्यांना ‘गुड टच आणि बॅड टच’बाबत माहिती द्यावी. नातेवाइकांबाबत माहिती द्यावी. अनोळखी व्यक्‍तीशी बोलणे, हसणे किंवा काही दिल्यास खाणे टाळण्याबाबत मुलींना सूचना द्याव्यात. त्यामुळे पाल्यांनाही बरे-वाईट याची ओळख होईल.
- सविता जगताप-जाधव

वयात येणाऱ्या मुलींच्या वागणुकीत होणाऱ्या बदलांवर विशेषतः आईने लक्ष द्यायला हवे. तिचे मित्र-मैत्रिणींबाबत माहिती आईने ठेवायला हवी. मुलींना मोबाईल देताना वापरण्याबाबत मर्यादा ठेवण्याबाबत सूचना द्याव्या. आगाऊ लाड टाळावेत. सोशल मीडियाचा वापर टाळणे किंवा कमी करण्यासाठी मुलींना सूचना द्याव्यात.
- अमृता जुनगडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com