मुंबई दुरांतोची फेरी दिवसाआड!

मुंबई दुरांतोची फेरी दिवसाआड!

पर्यायी डबे उपलब्ध नसल्याने अडचण
नागपूर - रुळावरून घसरलेल्या मुंबई दुरांतोचे डबे क्षतिग्रस्त झाले आहेत. अशा  प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण अतिरिक्त डबे उपलब्ध नसल्याने या डब्यांची पूर्ण दुरुस्ती होईपर्यंत मुंबई दुरांतो दिवसाआड चालविण्याचा निर्णय मुख्यालयस्तरावर घेतला जाऊ शकतो, असे संकेत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक बृजेशकुमार गुप्ता यांनी दिले. 

स्वच्छ रेल्वे पंधरवड्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले  की, मुंबई दुरांतो प्रवाशांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची गाडी आहे. अन्य कोणत्याही गाडीच्या तुलनेत ही गाडी चालविण्याला रेल्वेचे प्राधान्य आहे. दुरांतोची सेवा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने मुख्यालय स्तरावर निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, मंगळवारच्या अपघातात या गाडीचे डबे क्षतिग्रस्त झाले असून त्यांच्या दुरुस्तीला वेळ लागणार आहे.

दुरांतोची सेवा पूर्ववत करण्यासाठी पर्यायी डब्यांची गरज आहे. तशी मागणी रेल्वे मुख्यालयाकडे करण्यात आली आहे. मात्र, देशात कुठेही दुरांतोला जोडल्या जाणारे वैशिष्ट्यूपर्ण डब्यांची अतिरिक्त उपलब्धता असण्याची शक्‍यता फारच कमी आहे. या बाबी लक्षात घेता दुरांतोची फेरी एक दिवसा आड चालविली जाऊ शकते. 

नागपूरवरून रवाना होणारी ही गाडी दुसऱ्या दिवशी मुंबईला पोहोचेल. दुसऱ्या दिवशी तीच गाडी मुंबईवरून रवाना होऊ शकेल. उपलब्ध संसाधनात हा एकमेव पर्याय रेल्वेकडे आहे. मंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुरांतो एक्‍स्प्रेस महत्त्वाची गाडी असल्याने लवकरात लवकर ही सेवा पूर्वपदावर आणण्याचे रेल्वेचे प्रयत्न असल्याचे बृजेशकुमार गुप्ता यांनी सांगितले.

एलएचबी कोचने वाचवले 
दुरांतो एक्‍स्प्रेस विनाथांबा लांब पल्ल्याचे अंतर वेगात पूर्ण करते. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या गाडीला ॲलस्टन एलएचबी कोच वापरण्यात येतात. सुरक्षित आणि दणकट बनावटीचे हे डबे ताशी १६० किमी वेगाने सहज धावू शकतात. बाहेरून स्टीलची तर आतील रचनेत ॲल्युमिनियमचा वापर असलेल्या या डब्यांची लांबी-रुंदी सामान्य डब्यांपेक्षा अधिक आहे. याशिवाय सस्पेंशन दणकट आहेत.

ॲन्टीटेलिस्कोपिक यंत्रणा आणि सेंटर बफर कपलिंग  असल्याने अपघातातही डबे रुळावरून घसरले तरीही एकावर एक चढत नाहीत. शिवाय वेगळेही होत नाहीत. यामुळे अपघातातही जीवितहानीचे प्रमाण फारच कमी असते. मंगळवारी दुरांतो रुळावरून घसरून झालेल्या अपघातातही या बाबींची प्रचिती आली. दुरांतो ऐवजी सामान्य  एक्‍स्प्रेस असती तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकली असती, अशी भीती रेल्वेशी संबंधित तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com