नातेसंबंधातूनच मुंबई विद्यापीठाला मदत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मुंबई विद्यापीठातील वाणिज्य शाखेच्या दोन लाख उत्तरपत्रिका तपासण्यासाठी मदत करण्याच्या निर्णय घेतला. दरम्यान, या निर्णयावर विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आक्षेप नोंदवीत, केवळ नातेसंबंधातूनच हा निर्णय घेतल्याचा खळबळजनक आरोप केला. यासंदर्भात त्यांनी राज्यपालांकडे तक्रार नोंदविली. 

मुंबई विद्यापीठात निकाल लावण्यास होत असलेला उशीर यामुळे राज्यपालांनी कुलगुरूंना खडसावले. यातून वाणिज्य शाखेच्या निकाल लवकर लावण्यासाठी विद्यापीठाने नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंना साकडे घातले. त्यातून व्यवस्थापन परिषद आणि ४८/३ कलमांतर्गत मान्यता घेत, विद्यापीठाने नागपुरात मूल्यांकन करण्याचे ठरविले. त्यातूनच धनवटे नॅशनल आणि शिवाजी सायन्स महाविद्यालयात वाणिज्यच्या दोन लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याचे ठरविले. मात्र, नियमानुसार मूल्यांकन होत नसल्याचा दावा काही तज्ज्ञांनी करून या निर्णयासंदर्भात शाशंकता व्यक्त केली. विशेष म्हणजे विद्यापीठातील विविध प्राधिकरणाचा अनुभव असलेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी या प्रकरणावर कुलगुरूंना घेरून केवळ नातेसंबंधातून हा निर्णय झाल्याचा आरोप केला. 

निर्णय घेताना, गोपनियता, अभ्यासक्रमातील एकसारखेपणा, निर्णय घेणारे प्राधिकरण आदींवर प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. दरम्यान, मूल्यांकन करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या तेवढी आहे काय? याबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला आहे. याबद्दल राज्यपाल कार्यालयात तक्रार करून नियमांची खिल्ली उडविण्यात आल्याचे त्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. 
 
मुंबई विद्यापीठातील उत्तरपत्रिकांचे नागपूर विद्यापीठात होत असलेले मूल्यांकन नियमानुसारच करण्यात येत आहे. यापूर्वीही अशाप्रकारे मूल्यांकन करण्यात आले आहे. प्राध्यापकांच्या अनुभवाचा विचार केल्यास अनेक प्राध्यापक बाहेरच्या विद्यापीठात मूल्यांकनासाठी जातात. अभ्यासक्रमाच्या एकवाक्‍यतेबद्दल म्हणाल, तर बऱ्याच विद्यापीठांमधील अभ्यासक्रम काही प्रमाणात सारखे आहेत. शिवाय मदत म्हणूनच हे काम केले. त्यात कुठलेही नातेसंबंध असल्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.   
- डॉ. सि. प. काणे, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.