अनैतिक संबंधांमुळे पत्नी व मुलीनेच दिली खुनाची सुपारी

अनैतिक संबंधांमुळे पत्नी व मुलीनेच दिली खुनाची सुपारी

नागपूर - एका प्राध्यापक महिलेसोबत अनैतिक संबध असल्याने प्राचार्य डॉ. मोरेश्‍वर वानखेडे यांचा पत्नी व मुलीनेच सुपारी देऊन खून केला. या हत्याकांडाला अपघात किंवा लूटमारीचा देखावा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी मुलगी व पत्नीला ताब्यात घेऊन या प्रकरणाचा उलगडा केला. एकूण सहा आरोपींना बजाजनगर पोलिसांनी अटक केली, तर एक आरोपी अद्याप फरार आहे. 

पत्नी अनिता मोरेश्‍वर वानखेडे (वय ४२, रा. म्हाडा कॉलनी, नरेंद्रनगर), मुलगी सायली पवन यादव (वय २३), शुभम ऊर्फ बंटी मोहुर्ले, अंकित रामलाल काटेवार (वय १९), शशिकांत ऊर्फ सोनू चंद्रकांत चौधरी (वय १९), सागर ऊर्फ पाजी बावरी (वय २०) सर्व रा. नीलडोह- हिंगणा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. डॉ. मोरेश्‍वर वानखेडे (वय ६०) हे चंद्रपुरातील खत्री कॉलेजमध्ये प्राचार्य होते. ते शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास दुचाकीने रेल्वेस्टेशनला जात होते. दरम्यान, निरी गेटसमोर पाच आरोपींनी डॉ. वानखेडे यांच्या दुचाकीला मागाहून धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर तलवारीने सपासप वार करून खून केला आणि पळून गेले. प्राथमिकरीत्या लूटमार करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी खून केला असावा, असा संशय पोलिसांना होता. बजाजनगर पोलिसांनी मृतदेह मेडिकलमध्ये रवाना करून त्यांची पत्नी अनिता, मुलगा तन्मय आणि मुलगी सायला यादव यांना माहिती दिली. त्यांनीही लूटमारीतून खून झाल्याचा संशय व्यक्‍त केला होता. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

असा रचला कट
सायलीने प्रेमविवाह केला होता. मात्र, ती वर्षभरापासून आईकडेच राहत होती. दरम्यान, तिची शुभम मोहुर्ले याच्याशी जवळीक निर्माण झाली. दोघांची मैत्री घट्ट झाल्यानंतर तिने वडिलांच्या त्रासाबाबत सांगितले. तिने त्याची आईशी भेट घालून दिली. तिघांनी डॉ. वानखेडेंचा काटा काढण्याचा कट रचला. पाच लाखांत सुपारी देण्याचे ठरले. त्यासाठी शुभमने ‘सुपारी किलर’ शोधले. नीलडोह येथील पाजी बावरी याला दीड लाख रुपये अग्रिम तर उर्वरित साडेतीन लाख रुपये खून झाल्यावर देण्याचे ठरले. पत्नी अनिता आणि सायलीने डॉ. वानखेडेंची दिनचर्या दिली तसेच त्याचे लोकेशनसुद्धा आरोपींना दिले. 

३० ऑक्‍टोबरलाच होणार होता ‘गेम’
शुभमने पाजी बावरीला सुपारी दिल्यानंतर ३० ऑक्‍टोबरला खून करण्याचे ठरले होते. त्यासाठी डॉ. वानखडेंची १५ दिवस आरोपींनी रेकी केली. ते कुठे जातात, त्यांची दिनचर्या काय, कधी परत येतात, सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत, तसेच कोणती दक्षात घ्यायची, हे सर्व ठरले. ३० ऑक्‍टोबरला सर्व तयारी झाल्यानंतरही आरोपींनी जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे ‘गेम’ हुकला. ३ नोव्हेंबरला सायलीने मित्र शुभमला फोन करून वडील घरून निघाल्याचे सांगितले. आरोपींनी सीसीटीव्ही नसलेल्या निरी गेट परिसरात त्यांचा खून केला.

असा निर्माण झाला संशय 
डॉ. वानखेडे आणि शिक्षिका असलेली पत्नी अनिता यांच्यात पटत नव्हते. यापूर्वी अजनी पोलिस ठाण्यात मुलगा आणि पत्नीने मारहाण केल्याची तक्रार डॉ. वानखेडे यांनी केली होती. त्यानंतर भरोसा सेलमध्येही पती-पत्नीचे समुपदेशन करण्यात आले होते. त्यावरून घरात काहीतरी वाद नक्‍कीच असल्याचे पोलिसांना आढळून आले. बाहेरच्या आरोपींच्या टोळीपर्यंत पोहोचण्यापूर्वी पोलिसांनी तपासाची दिशा घरगुती वादावर केंद्रित केली होती.  

असा झाला उलगडा
पोलिसांनी पत्नी अनिता आणि मुलगी सायली हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दोघींनीही डॉ. वानखेडेंपासून त्रस्त झाल्याची माहिती दिली. सायलीचा मोबाईल ताब्यात घेतला असता त्यामध्ये शुभम नावाच्या युवकाला वारंवार फोन केल्याचे आढळून आले. शुक्रवारी पहाटे पाच वाजता शुभमने सायलीला फोन केला होता. तिला विचारणा केली असता ती अनुत्तरित झाली. त्यामुळे शुभमला ताब्यात घेण्यात आले. शुभमला पहाटे कॉल करण्याचे कारण विचारले असता तोसुद्धा घाबरला. अनिता, सायली आणि शुभमला पोलिसी खाक्‍या दाखवताच तिघांनीही खुनाची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com