राजकारण अतृप्त आत्म्यांचा समुद्र - गडकरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नागपूर - राजकारण अतृप्त आत्म्यांचा समुद्र आहे. त्यातही ज्यांना पात्रता असूनही काहीच मिळाले नाही ते शांत असतात. मात्र, बरेच काही मिळाले त्या अतृप्त आत्म्यांचीच तक्रार अधिक असते, अशी खरमरीत टीका केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी चमकोगिरी करणाऱ्या राजकारण्यांवर केली.

नागपूर - राजकारण अतृप्त आत्म्यांचा समुद्र आहे. त्यातही ज्यांना पात्रता असूनही काहीच मिळाले नाही ते शांत असतात. मात्र, बरेच काही मिळाले त्या अतृप्त आत्म्यांचीच तक्रार अधिक असते, अशी खरमरीत टीका केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी चमकोगिरी करणाऱ्या राजकारण्यांवर केली.

विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी टिळक पत्रकार भवनाच्या सभागृहात आयोजित अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी खासदार दत्ता मेघे होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ विचारवंतर विजय कुवळेकर,
विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे प्रदीप मैत्र व शिरीष बोरकर होते. मान्यवरांच्या हस्ते यंदाचा अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार मनीष अवस्थी व अशोक वानखेडे यांना प्रदान करण्यात आला. २१ हजारांचा धनादेश, शाल, श्रीफळ व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

राजकारण व पत्रकारितेसह सर्वच क्षेत्रांचा दर्जा खालावत असताना चांगले काम करणाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी यथोचित सन्मान करणे सामाजासाठी आवश्‍यक आहे. विदर्भाचा गौरव वाढविणाऱ्या विदर्भपुत्रांचा गौरव करणे या पुरस्कारामागील भूमिका आहे. संवेदनशीलता, लोकप्रबोधन व लोकसंस्काराची शक्ती शब्दांमध्ये आहे. समाज आणि देशातही पत्रकारिता बदल घडवू शकते, असा विश्‍वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

विचारभिन्नता हा अडसर नाही, तर विचारशून्यता ही आजची समस्या आहे. राजकारणात सत्ताकारणापेक्षा समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण करण्याची गरज आहे. जॉर्ज फर्नांडिस आपले आयकॉन असल्याचे गडकरी यांनी सांगितले. दत्ता मेघे यांनी अध्यक्षीय भाषणात वेगळा विदर्भ आपल्या हयातीत व्हावा, अशी भावना व्यक्त केली. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी केले. संचालन नितीन नायगावकर यांनी केले. दिलीप जाधव यांनी आभार मानले.

पत्रकारांची काळजी
दिल्लीत असलेले विदर्भातील पत्रकार वैदर्भीय माणसांची काळजी घेतात. त्यामागे प्रामाणिक भावना असते. ताकदीने विषय मांडतानाही मैत्री आणि काळजीचा धागा नेहमीच राहत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.