पहिल्या दिवशी राखला मान, आजपासून धरणार कान!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

नागपूर - धरमपेठेतील वाहनांच्या कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आज गुरुवारपासून ‘नो पार्किंग झोन’ अस्तित्वात आला. आज वाहतूक पोलिसांनी सकाळी आठपासूनच जनजागृतीसाठी ‘रूटमार्च’ केला. परिसरातील नागरिकांना वाहतूक व्यवस्था आणि नियमांची माहिती देण्यात आली. दिवसभरात एकाही वाहनावर दंडात्मक कारवाई न करता ‘गांधीगिरी’चा आधार घेण्यात आला. 

नागपूर - धरमपेठेतील वाहनांच्या कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आज गुरुवारपासून ‘नो पार्किंग झोन’ अस्तित्वात आला. आज वाहतूक पोलिसांनी सकाळी आठपासूनच जनजागृतीसाठी ‘रूटमार्च’ केला. परिसरातील नागरिकांना वाहतूक व्यवस्था आणि नियमांची माहिती देण्यात आली. दिवसभरात एकाही वाहनावर दंडात्मक कारवाई न करता ‘गांधीगिरी’चा आधार घेण्यात आला. 

वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून, अनेकांनी नियम पाळण्यास सुरवातसुद्धा केल्यामुळे आयुक्‍तांनी सुटकेचा निःश्‍वास घेतला. ‘सकाळ’ने धंतोलीत अशा प्रकारच्या उपक्रमाबाबत वृत्त प्रकाशित करून वाहतूक पोलिसांचे लक्ष वेधले होते. ‘सकाळ’च्या रेट्यामुळे आता धरमपेठेतही हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

धंतोलीच्या धर्तीवर धरमपेठेमध्ये ‘नो पार्किंग झोन, वन वे, वन साइड पार्किंग आणि वाहनांस पूर्णतः निर्बंध’ अशी अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईस प्रारंभ होणार होता. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्‍त रवींद्रसिंग परदेशी, पोलिस निरीक्षक जयेश भांडारकर मोठ्या फौजफाट्यासह धरमपेठमध्ये पोहोचले. त्यांनी वाहतूक पोलिसांना सूचना आणि मार्गदर्शन केले. नव्या नियमांच्या पहिल्या दिवशी दंडात्मक कारवाईऐवजी जनजागृती करण्याची भूमिका परदेशींनी घेतली. त्यांनी दंडात्मक कारवाईसाठी तैनात पोलिसांना ‘गांधीगिरी’ची सूचना दिली. पोलिसांनी मग दिवसभर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मार्गदर्शन करीत नियमांची माहिती दिली. 

या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले असून अनेकांनी दुकानासमोर पार्किंगसाठी जागा स्वच्छ व मोकळी करून दिली. पहिल्या दिवशी जनजागृतीनंतर उद्यापासून दंडात्मक कारवाईस सुरुवात होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे उपायुक्‍त रवींद्रसिंग परदेशी यांनी केले.

धरमपेठमधील वाहनांच्या गर्दीवर नियंत्रणासाठी नव्याने लागू केलेल्या नियमांचे स्वागत होत असले तरीही अनेकांनी वाहतूक विभागाला सूचना दिल्या आहेत. लक्ष्मीभुवन चौक ते रामनगर चौक हा मार्ग केवळ दुचाकी पार्किंगसाठी राखीव आहे. मात्र, या मार्गावरील कार्यालये, रुग्णालये आणि अन्य प्रतिष्ठाने बघता या मार्गावर एका बाजूने कार पार्किंगची व्यवस्था करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.