अंतर्गत बदल्यांना परिचारिकांची ‘ना’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कॅज्युअल्टीसह काही वॉर्डात प्रचंड काम आहे. कामाचा अतिरिक्त बोजा असतो. यामुळे वॉर्डातून मुक्ती मिळावी यासाठी अनेक परिचारिका प्रयत्नशील असतात. तर, काही परिचारिका वर्षांनुवर्षे एकाच वॉर्डात, एकाच ठिकाणी कार्यरत आहेत, तर काहींचे ‘लाइट वॉर्डा’साठी प्रयत्न सुरू असतात. अशावेळी परिचारिका अधीक्षक (मेट्रन) कार्यालयातून परिचारिकांची बदली झाल्यानतंरही रुजू होण्यास तयार नसतात. हा प्रकार नुकताच मेडिकलमध्ये पुढे आला आहे. अंतर्गत बदली झाल्यानंतरही परिचारिका ‘वॉर्ड’ सोडण्यास तयार होत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.

शल्यक्रियागृहातील टेबलवर कार्यरत असलेल्या परिचारिकांची बदली सहसा होत नाही, हे ठीक आहे. एका शल्यचिकित्सागृहातून दुसऱ्या शल्य चिकित्सागृहात बदलीवर जाऊ शकतात. परंतु, यालाही परिचारिकांची ‘ना’ असते. विशेष असे की, मेट्रन कार्यालयातून काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात परिचारिकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. परंतु, परिचारिका जम बसलेली जागा सोडण्यास का तयार होत नाही, हे एक न उलगडणारे कोडे आहे. 

मेडिकलमध्ये पन्नास वॉर्ड, कॅज्युअल्टी, बाह्यरुग्ण विभाग, अतिदक्षता, रिकव्हरीसह, शिशू  काळजी केंद्रासह अनेक विभागांत एक हजारावर परिचारिका रुग्णसेवा देतात. सर्वाधिक काम असलेल्या कॅज्युअल्टी, बाह्यरुग्ण विभाग, अस्थिव्यंग विभाग, सर्जरी विभाग, कॅन्सर विभागात काम करण्यास अनेक परिचारिकांची ‘ना’ असते. परंतु, ज्या परिचारिकांना ‘लाइट वॉर्ड’त काम मिळाले आहे, असे वॉर्ड बदली झाल्यानंतरही सोडण्यास परिचारिका तयार नसल्याची चर्चा मेडिकलमध्ये रंगली आहे. 

वरिष्ठ परिचारिकांची तक्रार ग्राह्य... 
मेडिकलमध्ये अनेक परिचारिका निवृत्तीच्या उंबरठ्यावर आल्या आहेत. अशा परिचारिकांना बाह्यरुग्ण विभागात किंवा कामाचा कमी ताण असेल अशा ठिकाणी काम द्यावे. परंतु याकडे खुद्द मेट्रन कार्यालयाचे दुर्लक्ष आहे. वरिष्ठ परिचारिकांना त्यांच्या मर्जीनुसार काम दिल्यास त्यांचाही आदर राखल्यासारखे होईल, असे खुद्द मेडिकलमधील डॉक्‍टरांचे म्हणणे आहे.

आजारी परिचारिकांना द्यावा लाइट वॉर्ड
लाइट वॉर्डात कामाचा ताण कमी असतो. ज्या परिचारिका आजारी आहेत, अशा परिचारिकांना कामाची संधी देण्यासाठी लाइट वॉर्ड ही संकल्पना राबवली जाते. परंतु, अलीकडे लाइट वॉर्डात ड्यूटी मिळविण्यासाठी परिचरिकांमध्ये चढाओढ असते. यासाठी गैरव्यवहारही होत असल्याची चर्चा परिचारिकांमध्ये आहे. यासंदर्भात नाव न सांगण्याच्या अटीवर वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातूनही दुजोरा मिळाला आहे. दर दोन किंवा तीन वर्षातून वॉर्डांतून, बाह्यरुग्ण विभाग, कॅज्युअल्टीतून परिचारिकांची बदली होणे आवश्‍यक आहे. परंतु, अंतर्गत बदली झाल्यानंतरही परिचारिका वॉर्ड सोडण्यास तयार नसल्याची माहिती पुढे आली आहे.