एकदाच मिळणारे आयुष्य भरभरून जगा... - लोकनाथ यशवंत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

नागपूर - आयुष्य एकदाच मिळते. ते कसं जगायचं आहे, ते ठरविण्याचा अधिकार आपला आहे. एकदाच मिळालेले आयुष्य भरभरून जगावं. परंतु, जगताना आपली वाट निश्‍चित करावी, कला असो की, कविता या वाटेवर चालताना संघर्ष केल्यास यश मिळते, असा विश्‍वास जागतिक दर्जाचे कवी लोकनाथ यशवंत यांनी आज येथे केले. 

नागपूर - आयुष्य एकदाच मिळते. ते कसं जगायचं आहे, ते ठरविण्याचा अधिकार आपला आहे. एकदाच मिळालेले आयुष्य भरभरून जगावं. परंतु, जगताना आपली वाट निश्‍चित करावी, कला असो की, कविता या वाटेवर चालताना संघर्ष केल्यास यश मिळते, असा विश्‍वास जागतिक दर्जाचे कवी लोकनाथ यशवंत यांनी आज येथे केले. 

अश्‍वघोष कला अकादमी व बहुजन रंगभूमीतर्फे उर्वेला कॉलनीतील डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवनात पाच दिवसांच्या ‘थिएटर प्रॉडक्‍शन’वरील कार्यशाळेच्या समारोपीय सोहळ्यात लोकनाथ बोलत होते. गीत व नाट्य विभागाचे माजी संचालक डॉ. नीलकांत कुलसुंगे यांनी व्यक्‍त केले. लखनौ येथील संगीततज्ज्ञ महेश कुमार, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या स्नेहलता तागडे, रंगकर्मी ललित खोब्रागडे उपस्थित होते. डॉ. नीलकांत कुलसुंगे यांनी शिबिरातील कलावंतांनी कलेच्या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर भविष्यातील आव्हाने पेलवण्याची तयारी ठेवावी. ही आव्हाने पेलविल्यास यशाच्या शिखरावर पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले. 

स्नेहलता तागडे म्हणाल्या, बाबासाहेबांचा विचार मनात, डोक्‍यात आहे. परंतु, देशभरातील कला संस्कृतीचा अभ्यास करताना मी आणि माझा विचार सांगून संपत नाही, तर साऱ्या संस्कृतीची चव चाखावी लागते. कलम वागधरे यांनी शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. उपराजधानीत कलेच्या क्षेत्रात प्रचंड ऊर्जा आहे. यांना संधीची प्रतीक्षा असल्याचे वागधरे म्हणाले. 

ललित खोब्रागडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार कलेच्या माध्यमातून समाजात पोहोचविण्याचे काम  बहुजन रंगभूमी करीत आहे. कलेचा विकास होण्यासाठी युजीसीकडे प्रत्येक महाविद्यालयात  थिएटर हा विषय शिकविण्यासंदर्भातील मागणीला जोर देण्यासाठी नव्याने चळवळ उभारण्याची  गरज आहे. शिबिरात ‘पायदान’ ही एकांकिका अवघ्या चार दिवसांत शिबिरातील कलावंतांनी सजविली. या वेळी बहुजन रंगभूमीचे अमित गणवीर यांचा सत्कार केला. संचालन वीरेंद्र गणवीर यांनी केले.  

स्नेहाचे गुरू कमल
ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक कमल वागधरे स्नेहलता तागडे यांचे गुरू असून गुरूंनी प्रश्‍न विचारून कलेच्या प्रांतात येण्याचे आव्हान उभे केले. त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी वाट दाखवली. यामुळे उत्तुंग यशाकडे झेप घेता आली असे राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या स्नेहलता तागडे म्हणाल्या.