समांतर जिल्हाधिकारी कार्यालयाचा पर्दाफाश

समांतर जिल्हाधिकारी कार्यालयाचा पर्दाफाश

नागपूर - गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाझरी परिसरातील घरावर छापा घालून समांतर जिल्हाधिकारी कार्यालयाचा पर्दाफाश केला. यात पोलिसांनी शेकडो बनावट रबरी स्टॅम्प, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदारांसह पोलिस ठाण्यातील बनावट कागदपत्रे जप्त केली. नितीन ईश्‍वर वासनिक (२८, रा. संजयनगर, अंबाझरी) या युवकाला अटक केली.

शहरात अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि शालेय दाखले आढळून येत होती. याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्‍तांकडे अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलिस महिनाभरापासून शासकीय कार्यालयात ‘वॉच’ ठेवून होते. बनावट पंटर पाठवून बनावट कागदपत्रे तयार करीत प्रत्यक्ष व्यवसाय कसा चालतो, याबाबत माहिती घेतली. ठोस माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी सायंकाळी अंबाझरीतील संजयनगरातील जुना फुटाळाजवळ राहणाऱ्या श्रीमती सरस्वती अशोक सहारे यांच्या घरावर छापा घातला. यांच्या घरी भाड्याने राहणारा आरोपी नितीन वासनिक या युवकाला ताब्यात घेतले. घराची झडती घेतल्यानंतर संगणक, प्रिंटर, रबरी स्टॅम्प बनविण्याची मशीन, स्कॅनर, कॅमेरा, पेन ड्राईव्ह, सीडी-डीव्हीडी, लॅमिनेशन मशीन, डाय कटर आणि वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील बनावट कोरे कागदपत्रे पोलिसांना आढळली. त्याच्याविरुद्ध अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ड्रायव्हिंग लायसन्समुळे पर्दाफाश
नितीनचा गोरखधंदा केवळ एका बनावट वाहन परवानामुळे उघडकीस आला. हा गोरखधंदा जवळपास दोन वर्षांपासून सुरू होता. एका युवकाला पोलिसांनी पकडले होते. त्याच्याकडे बनावट वाहन परवाना मिळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर मोठे घबाड उघडकीस आले. नितीन वासनिक कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याची  हुबहूब सही करतो. तसेच संबंधित कार्यालयातील दलालाच्या नेहमी संपर्कात राहतो.

शासकीय कार्यालयात खळबळ
जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक आणि सरपंचाचे अनेक बनावट रबरी स्टॅम्प आढळले. त्यामुळे स्वतंत्र जिल्हाधिकारी कार्यालयच  तो दोन रूमच्या घरातून चालवित होता. पोलिसांनीही छाप्यात सापडलेली प्रमाणपत्रे पाहून आश्‍चर्याचा धक्का बसला. ही प्रमाणपत्रे बनविण्यासाठी काही शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मदत घेत होता. त्यासाठी त्यांना कमिशन म्हणून काही रक्‍कम तो देत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात खळबळ उडाली आहे.

तासाभरात जातपडताळणी प्रमाणपत्र
जातीचा दाखल काढण्यासाठी जवळपास आठ दिवसांचा कालावधी लागतो. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी खूप खटाटोप करावी लागतो. अनेक कागदपत्रे गोळा करावी लागतात. त्यामुळे अनेक जण त्रस्त होतात. जात पडताळणीला जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मात्र, नितीनकडे ते प्रमाणपत्र केवळ पाच हजारांत तासाभरात बनवून मिळत होते. त्यामुळे काम भागविण्यासाठी अनेकांनी जातपडताळणी प्रमाणपत्रे नितीनकडूनच घेतल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी बारावी नापास
नितीन वासनिक मूळचा रामटेक तालुक्‍यातील देवलापार येथील रहिवासी आहे. तो बारावीत नापास झाल्यामुळे कामाच्या शोधात नागपुरात आला. तो जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर बनावट जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याची कल्पना सुचली. त्याने अनेक शासकीय कार्यालय  गाठून तेथील दलालांना ग्राहक बनवले. केवळ बारावी नापास असलेला नितीन आज जिल्हाधिकारी ते पोलिस अधिकाऱ्यांपर्यंतची सर्व कागदपत्रे तासाभरात बनवून देतो. त्याच्याकडे दलालाची मोठी साखळी असून, त्यामध्ये काही शासकीय कर्मचारीसुद्धा सहभागी असल्याची माहिती आहे.

‘ही’ प्रमाणपत्रे तासाभरात
आरोपी नितीन वासनिक दस्तावेज बनविणाऱ्या बनावट कारखान्यात जातप्रमाणपत्र, जातपडताळणी प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड, लिव्हिंग सर्टिफिकेट, इलेक्‍शन कार्ड, इन्शुरन्स, उत्पन्नाचा दाखला, एफिडेविट, जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, विद्यापीठ प्रमाणपत्र, पोलिस स्टेशनची मिसिंग रिपोर्ट, टॅक्‍स पावती, डोमिसाइल प्रमाणपत्र यासह ५५ प्रकारचे दाखले तासाभरात बनवून देत होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com