पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली एसीबीची धास्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

नागपूर - लाचलुपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी कुही पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष काळे आणि सहकारी संजय चव्हाण यांना दोन लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केली. या कारवाईनंतर पोलिस विभागात एकच खळबळ उडाली. बुधवारी दिवसभर पोलिस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांनी एसीबीची धास्ती घेऊन सावधतेचा पवित्रा घेत ‘वसुली’ थांबवल्याची माहिती पोलिस विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

कुहीजवळून गेलेल्या राज्य महामार्गावर असलेले एक बार ॲण्ड रेस्टॉरेंट नवीन नियमानुसार बंद पडले. त्यामुळे बारमालकाने ५०० मीटरपेक्षा जास्त अंतर सोडून शेती विकत घेतली. दरम्यान, शेतकऱ्याशी पैशावरून वाद झाला. दोघांकडूनही कुही पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज आले. त्यामुळे कुही पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांनी बारमालकाला दमदाटी करून पाच लाखांची लाच मागितली. बारमालकाने एसीबीकडे तक्रार केली. तडजोडीअंती दोन लाख रुपये सुभाष काळे व पीएसआय चव्हाणने स्वीकारले.

एसीबीने दोघांनाही अटक केली. या कारवाईमुळे नागपूर ग्रामीण आणि शहर पोलिस दलात एकच खळबळ उडाली. कारण अनेक बार आणि सावजी हॉटेलवाल्यांकडून काही पोलिस अधिकारी महिन्याकाठी ठरवलेली वसुली करतात. मात्र, या एसीबी ट्रॅपमुळे त्यांच्यातही धास्ती निर्माण झाली आहे. अनेक अधिकाऱ्यांनी वसुली पथकाला थांबण्याचे आदेश दिले, तर काहींनी थेट संपर्क साधण्याऐवजी खासगी व्यक्‍तीस पाठविण्यास सुरुवात केल्याची माहिती पोलिस विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. राज्यात एसीबीने ५१ सापळे रचले असून, त्यामध्ये ६९ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. यामध्ये ८ क्‍लास वन, ८ क्‍लास टू आणि ४१ तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.