तब्बल १८ वर्षांनंतर कोहचाडेला कारावास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

बोगस पदवी, गुणवाढ प्रकरण - पोलिसाला लाच देताना झाली होती अटक

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बहुचर्चित बोगस पदवी आणि गुणवाढ प्रकरणातील मुख्य आरोपी तसेच माजी उपकुलसचिव यादव नथ्थोबा कोहचाडे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी बुधवारी (ता. १९) चार वर्षे कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

बोगस पदवी, गुणवाढ प्रकरण - पोलिसाला लाच देताना झाली होती अटक

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील बहुचर्चित बोगस पदवी आणि गुणवाढ प्रकरणातील मुख्य आरोपी तसेच माजी उपकुलसचिव यादव नथ्थोबा कोहचाडे याला जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी बुधवारी (ता. १९) चार वर्षे कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

बोगस पदवी आणि गुणवाढ प्रकरणाचा तपास करणाऱ्या तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अनिल लोखंडे यांना सात लाख रुपये लाच देताना कोहचाडेला रंगेहात पकडण्यात आले होते. तब्बल १८ वर्षांनंतर कोहचाडेला शिक्षा सुनावण्यात आली आहे. नागपूर विद्यापीठाची केवळ भारतातच नव्हे विदेशातही बदनामी करणाऱ्या आणि हजारो उत्तीर्ण विद्यार्थ्यांची नोकरी धोक्‍यात आणणाऱ्या अनेक प्रकरणांपैकी प्रशांत उईके या व्हीएनआयटीतील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा समावेश होता. सुरेश मानमोडे आणि मधुकर स्मार्त हे स्क्रुटिनायझर होते. फेरमूल्यांकनाचे गुण नोंदविण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यानंतर कोहचाडेच्या स्वाक्षरीने अधिसूचना जारी करण्यात यायची. 

कोहचाडे स्वत:चे काम करण्याऐवजी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधायचा. याच माध्यमातून त्याने उईकेशी संपर्क साधला. उईकेकडून पैसे घेऊन इतर आरोपींच्या साहाय्याने कोहचाडे याने गुणांमध्ये फेरफार केली. अशा पद्धतीने दीडशेपेक्षा अधिक प्रकरणांमध्ये कोहचाडे हा आरोपी आहे. उईके याला सीताबर्डी पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक लोखंडे यांनी १८ जून १९९९ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता तपासाकरिता बोलाविले होते. उईके गेल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता कोहचाडेने पोलिस उपनिरीक्षक लोखंडे यांना फोन करून रहाटे कॉलनी चौकात बोलावले. लोखंडे यांनी कोहचाडेची भेट घेतली. त्यावेळी कोहचाडेने उईकेला चौकशीसाठी परत बोलाविण्यात येऊ नये तसेच फेरमूल्यांकन घोटाळ्यामध्ये विशालक्ष्मी (कोहचाडेचा पंटर) याचे नाव आरोपीमध्ये येऊ नये यासाठी सात लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. ही रक्कम १९ जून १९९९ रोजी हॉटेल गणगौर येथे दुपारी २ वाजतादरम्यान देण्याचे ठरले. ही माहिती लोखंडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. यानुसार त्यांनी सापळा रचून कोहचाडेला लाच देताना रंगेहात पकडले. याप्रकरणी गेल्या अठरा वर्षांपासून सुनावणी सुरू होती. प्रकरणातील विविध बाबी आणि साक्षीदारांनी दिलेल्या बयाणानुसार तब्बल अठरा वर्षांनंतर न्यायालयाने कोहचाडेला शिक्षा सुनावली. याप्रकरणी सरकारतर्फे ॲड. वर्षा आगलावे, ॲड. राजेंद्र मेंढे यांनी कामकाज पाहिले.

पहिल्यांदाच शिक्षा
कोहचाडेविरुद्ध दोनशे विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत. या घोटाळ्यात कोहचाडेसह विद्यापीठाच्या १६ अधिकाऱ्यांचा समावेश होता. मात्र, एकाही प्रकरणात कोहचाडेला शिक्षा झाली नाही. कोहचाडेला शिक्षा होण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या कार्यकाळात वाहनचालक म्हणून विद्यापीठात रुजू झालेला कोहचाडे पुढे उपकुलसचिव पदापर्यंत पोहोचला. कुलगुरू चोपणे यांच्या कार्यकाळात त्याने संपूर्ण भ्रष्टाचार केला. मात्र, पुराव्याअभावी त्याला एकाही प्रकरणात शिक्षा झाली नाही. मुख्य म्हणजे त्याच्यासोबतच्या इतर आरोपींचीदेखील निर्दोष मुक्तता झाली आहे. वाहनचालक म्हणून नोकरीची सुरुवात करणारा कोहचाडे सध्या गॅरेज चालवतो आहे, हे उल्लेखनीय!

कोऱ्या गुणपत्रिकेवर कोहचाडेंची सही
कोऱ्या गुणपत्रिकेवर कोहचाडेची सही असल्याचे वृत्त ९ मार्च १९९९ रोजी प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर ११ मार्च १९९९ रोजी झालेल्या सिनेटच्या बैठकीमध्ये हा मुद्दा गाजला. यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यात कोहचाडेचे नाव पुढे आले. कालांतराने कोहचाडे याने केलेल्या घोटाळ्याची व्याप्ती तपासामध्ये दिसून आली. आजही कोहचाडे प्रकरणामुळे झालेली नागपूर विद्यापीठाची बदनामी पुसण्यात विद्यापीठाला पूर्णत: यश आलेले नाही.