बिनधास्त करा पितृपक्षात खरेदी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

ज्योतिष्यांचा सल्ला - पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्र काळ

नागपूर - पितृपक्ष पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्र काळ. या काळात शुभकार्य करणे अशुभ मानने गैरसमज आहे. खिशात पैसे असेल तर या काळात बिनधास्त खरेदी-विक्रीचे व्यवहार करावे, असा सल्ला ज्योतिष्यशास्त्रींचा आहे. 

ज्योतिष्यांचा सल्ला - पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्र काळ

नागपूर - पितृपक्ष पूर्वजांच्या स्मरणाचा पवित्र काळ. या काळात शुभकार्य करणे अशुभ मानने गैरसमज आहे. खिशात पैसे असेल तर या काळात बिनधास्त खरेदी-विक्रीचे व्यवहार करावे, असा सल्ला ज्योतिष्यशास्त्रींचा आहे. 

पितृपक्षात पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, अशी श्रद्धा आहे. पितृपक्षाचे १५ दिवस वाईट मानले जातात. या काळात सोने, घर तसेच मौल्यवान वस्तूंची खरेदी-विक्री केली जात नाही. विवाहाचे मुहूर्तही टाळले जातात. परंतु, या समजुती चुकीच्या आहेत. याच काळात पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत असल्याने खरेदी-विक्री करण्यास हरकत नाही. आपले व्यवहार पूर्ववत ठेवून जुन्या चालीरीतींना फाटा द्यावा. १५ दिवस खरेदी-विक्री बंद करता मग जेवण का बंद करीत नाही, असा प्रश्‍नही ज्योतिष्यांनी उपस्थित केला. 

आपले पूर्वज या दिवसात पृथ्वीवर येतात, अशी श्रद्धा असेल तर या दिवसांत करीत असलेल्या गोष्टींना पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल. पूर्वजांचा आशीर्वाद वाईट कसा असेल? ज्यांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिले, संपत्ती दिली अशा पूर्वजांना आपण पितृपक्षातील या दिवसात श्रद्धांजली वाहत असतो. हा पंधरवडा त्यांच्या स्मरणाचा काळ. यामुळे या काळात खरेदी करणे वाईट  अथवा अशुभ कसे असू शकते. हा अंधविश्‍वास आहे. पंचांगात काही सुविधा दिलेल्या आहेत. अडचणीच्या वेळी सुविधा नसल्या तरी लग्न, खरेदी अथवा इतरही मुहूर्त काढले जातात. 
- डॉ. अनिल वैद्य, आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य 
 

पितृपक्षात खरेदी-विक्री करू नये, ही जुनी परंपरा आहे. अत्याधुनिक काळातही त्यावरच री  ओढली जाते. परंतु, पितृपक्षातच अधिकतम घाऊक व्यापारी खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात. नवरात्र आणि दिवाळीची खरेदी करण्यासाठी हा ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला काळ असतो. या काळात ग्राहक कमी असल्याने व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. परंतु, ग्राहक या दिवसांत नवीन वस्तू, वाहन, कपडे, लग्नाची खरेदी करीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 
- अशोक संघवी, कार्यकारिणी सदस्य नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स

पितृपक्षात खरेदी-विक्री व्यवहार करण्यास हरकत नाही. या काळात लोकांनी आपले व्यवहार पूर्ववत ठेवावे. खरेदीसाठी कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नाही. तुमची खरेदीची क्षमता असेल तेव्हा खरेदी करावी. मुहूर्त पाहू नये. या दिवसात खरेदी-विक्री केल्यास दोष लागतो, असे मानने चुकीचे आहे. 
- नरेंद्र बुंदे, अंकज्योतिषी

पितृपक्षात सोने, गृह, मौल्यवान वस्तूंची खरेदी करू नये, असा उल्लेख कुठेच नाही. त्यामुळे या काळात खरेदी करण्यास हरकत नाही.   
- मधुकरशास्त्री आर्वीकर सुप्रसिद्ध पुरोहित