नागपुरात "राफेल'च्या सुट्या भागांची निर्मिती - अनिल अंबानी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

नागपूर - 'भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल विमानांच्या खरेदीचा करार झाला आहे. या करारानुसार राफेल विमानाला लागणाऱ्या सुट्या भागांची निर्मिती करणारा सर्वांत मोठा प्रकल्प मिहानमध्ये सुरू होणार,'' अशी घोषणा शुक्रवारी (ता. 27) रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी येथे केली.

नागपूर - 'भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल विमानांच्या खरेदीचा करार झाला आहे. या करारानुसार राफेल विमानाला लागणाऱ्या सुट्या भागांची निर्मिती करणारा सर्वांत मोठा प्रकल्प मिहानमध्ये सुरू होणार,'' अशी घोषणा शुक्रवारी (ता. 27) रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी उद्योगसमूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी येथे केली.

रिलायन्स आणि फ्रान्सच्या डसो एव्हिएशन यांनी संयुक्तपणे मिहानमध्ये धीरुभाई अंबानी एअरोस्पेस पार्क उभारला आहे. याची औपचारिक घोषणा आणि कोनशिला अनावरण समारंभ शुक्रवारी झाला. या वेळी प्रकल्पाबाबत माहिती देताना अनिल अंबानी बोलत होते. या वेळी फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ले, फ्रान्सचे राजदूत अलेक्‍झांडर झेल्गर, डसोचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक ट्रॅपियर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

'सुरक्षेच्या क्षेत्रातील सर्वांत मोठी खासगी गुंतवणूक असलेल्या या एअरोस्पेस सेंटरमध्ये 10 कोटी डॉलर गुंतवणूक करण्यात येईल. राफेलप्रमाणेच फाल्कन 2000 विमानांचे सुटे भागदेखील येथे तयार होतील. या माध्यमातून 5 हजार प्रत्यक्ष आणि 15 हजार अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होईल,'' असे अंबानी म्हणाले.

फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ले यांनी लोकशाहीवर विश्‍वास ठेवणाऱ्या राष्ट्रांनी एकमेकांना मदत करण्याची गरज असल्याचे सांगत हा प्रकल्प दोन्ही राष्ट्रांतील संबंध अधिक मजबूत करण्यात मदतशीर ठरेल, अशी अपेक्षा केली. तसेच या करारांमुळे दोन्ही राष्ट्रात होणाऱ्या सुरक्षाक्षेत्रातील देवाणघेवाण अधिक वाढणार असल्याचे त्या म्हणाल्या; तर एअरोस्पेस पार्कमुळे मिहान खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचेल, असा विश्‍वास गडकरींनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिहानला गतिशील करण्यात प्रकल्पाची मुख्य भूमिका राहणार असल्याचे सांगितले.

असा आहे प्रकल्प
जागा - 300 एकर
गुंतवणूक - 10 कोटी डॉलर
राफेल, फाल्कनचे सुटे भाग तयार होणार
प्रत्यक्ष रोजगार- 5 हजार
अप्रत्यक्ष रोजगार - 15 हजार
जागतिक दर्जाचे निर्मिती हब
पूर्णत: भारतीय बनावटीची विमाने बनविणार