रिलायन्स जिओला हायकोर्टाचा दिलासा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नागपूर - उपराजधानीत ‘फोर-जी’ सेवेचे जाळे उभारण्यासाठी जागोजागी खोदलेले खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा बुधवारी (ता. २३) रिलायन्स जिओ कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केला. कंपनीतर्फे सादर करण्यात आलेल्या माहितीच्या  आधारावर समाधान व्यक्त करत न्यायालयाने जनहित याचिका निकाली काढली. 

जिओचे टॉवर उभारण्यासाठी करण्यात आलेल्या एका खड्ड्यात पडून काही दिवसांपूर्वी पिंकी आर्केश सोळंकी या मुलीचा मृत्यू झाला. शहरभर करण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा करणारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्ता शाहबाज सिद्दीकी यांनी दाखल केली.

याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान रिलायन्सतर्फे सर्व खड्डे बुजविल्याची माहिती देण्यात आली. तसेच एका प्रकरणात खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.

सद्य:स्थितीत जिओच्या टॉवरसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे कुठलाही अपघात झालेला नाही, हेदेखील स्पष्ट करण्यात आले. मागील सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्याला शहरामध्ये जिओच्या खड्ड्यांमुळे धोका असल्याचे कुठे आढळून येत आहे का, याबाबत सर्वेक्षण  करण्यास सांगितले होते. मात्र, कंपनीतर्फे देण्यात आलेल्या माहितीवर याचिकाकर्त्यानेदेखील समाधान व्यक्त केले. दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने अखेर ही जनहित याचिका निकाली काढली. याप्रकरणी याचिकाकर्त्यातर्फे ॲड. श्रीरंग भांडारकर तर, रिलायन्स जिओतर्फे ॲड. अक्षय नाईक यांनी बाजू मांडली. 

खड्ड्यांमुळे झाले होते अपघात
रिलायन्सने खोदलेल्या खड्ड्यांमुळे बरेच अपघात झाले. २६ जून २०१३ रोजी हर्षल मेश्राम  हा नऊ वर्षीय मुलगा खड्ड्यात पडला होता. ५ ऑक्‍टोबर २०१३ रोजी शक्तीकुमार खन्ना  नावाचे ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक भरतनगर येथील खड्ड्यात पडले होते. १८ जुलै २०१४ रोजी अंकेन इरिक हे ५४ वर्षीय गृहस्थ मेकोसाबाग ले-आउटमधील सहा फूट खोल खड्ड्यात पडले होते. काही महिन्यांपूर्वीच १८ महिन्यांची त्रिशा नरेश ढोके ही चिमुरडी रामबागजवळील एका खड्ड्यात पडली होती, हे येथे उल्लेखनीय!