धार्मिक पर्यटनाचा झेंडा घ्या हाती

धार्मिक पर्यटनाचा झेंडा घ्या हाती

नागपूर - विदर्भात पट्टेरी वाघ पाहण्यासाठी पर्यटकांची दरवर्षी झुंबड उडते. या भागातील संपूर्ण पर्यटन वाघावर केंद्रित आहे. वनपर्यटनाशिवाय विदर्भात अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा असलेली पर्यटनस्थळे आहेत. त्याची दुरवस्था झाली आहे. आतापर्यंतच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने पर्यटनक्षेत्रात रोजगाराची निर्मितीही होऊ शकली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर विदर्भातील पर्यटनस्थळाच्या मार्केटिंग आणि विकासाचा झेंडा हाती घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नागपूर व्याघ्रभूमीचे प्रवेशद्वार असल्याने देश-विदेशातील लाखो पर्यटक मध्य प्रदेशातील पेंच, कान्हा किसलीसह विदर्भातील मेळघाट, ताडोबा, नवेगाव-नागझिरा, पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प, उमरेड-कऱ्हांडलासह इतर वन्यजीव अभयारण्यात पर्यटनासाठी भेट देत असतात. वाघासोबत येथे जंगलातील अन्य वन्यप्राणीही सहज पाहता येतात. नशीब फारच जोरावर असेल, तर वाघ शिकार करतानाचे दृश्‍यही अनुभवता येते. विदर्भातील पर्यटन पूर्णपण वाघाभोवती केंद्रित झाले आहे. त्यामुळे इतर पर्यटनस्थळे दुर्लक्षित आहेत. नागपुरातील दीक्षाभूमी, रामटेकचे कालिदास स्मारक, राम मंदिर, कामठीचे ड्रॅगन पॅलेस, वर्ध्याचे पवनार आश्रम, महात्मा गांधीचे सेवाग्राम आश्रम, शेगावचे आनंदसागर, अकोटचे जैन मंदिर, भद्रावतीचे जैन मंदिर, चंद्रपूरचे महाकाली मंदिर अशी कितीतरी धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. विदर्भात वन, ऐतिहासिक कला, ऐतिहासिक मंदिरांची दुरवस्था झाली आहे. 

मिळाला रोजगार
विदर्भातील व्याघ्र पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला आहे. हजारो युवकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. ग्रामीण भागातील युवकांना प्रकल्पात गाइड म्हणून काम करू लागले आहे. सोबत जंगलाच्या शेजारी हॉटेल्स उभी ठाकल्याने स्वयंपाकीपासून ते साफसफाईसह इतरही कामे उपलब्ध झाली आहेत. स्थानिकांनी आपल्या जागेवर हॉटेल्स उभी करून इतरांनाही रोजगार दिला आहे. सोबतच प्रकल्पातील भ्रमंतीसाठी जिप्सीची सक्ती केल्याने स्थानिकांना जिप्सी भाड्याने दिल्याने रोजगार निर्मिती झाली आहे. पर्यटन हा शेतीनंतर सर्वाधिक रोजगार निर्मिती करणारा उद्योग असल्याने याकडे लक्ष केंद्रित करणे काळाची गरज आहे. 

ग्लोबल मार्केटिंगची गरज
केरळ आणि गोवा या राज्यातील समुद्र किनारा लाभला. त्या राज्यांनी त्याचे योग्य प्रकारे मार्केटिंग आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे पर्यटन वाढले आणि पर्यटनावरच या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात जंगल, ऐतिहासिक धार्मिक स्थळे आणि चिखलदरासारखे थंड हवेचे ठिकाण आहे. देश-विदेशात मार्केटिंगसह पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास या भागाची अर्थव्यवस्था पर्यटनाच्या माध्यमातून मजबूत होणार आहे.   

असेही करता येईल
धार्मिक स्थळेही आर्थिक उलाढालीची फार मोठी केंद्र आहेत. त्यांच्या बाहेर आणि आतही मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते. अनेक धार्मिक स्थळांना मिळणाऱ्या निधीचे मोजमाप होत नाही. पण, धार्मिक स्थळांच्या बाहेर असलेला व भक्तांच्या पायातील जोडे सांभाळणाराही रोजगार मिळवत असतो. त्यामुळे धार्मिक पर्यटनाकडे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले जात नाही. पर्यटनस्थळावर गेल्यावर त्या स्थळाची माहिती पाहिजे असेल तर पुस्तिकाही तयार करून नवीन रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यासाठी पर्यटक पैसे द्यायला तयार असतात. पण, आपल्याकडे पाहिजे त्या सोयीच उपलब्ध होत नसल्याची खंत अनेक पर्यटकांनी बोलून दाखविली.

पर्यटनस्थळांना हवा रस्त्याचा सेतू
विदर्भात पर्यटनाला चांगली सोय असूनही ती संस्कृती जतन न केल्याने आपण कधीचेच मागे पडलो आहोत. विदर्भात रामटेक, नगरधन, गाविलगड किल्ला, चिखलदरा, हेमलकसा, लोणार, नरसाळा, कचारगड गुंफा, मार्कण्डेय ही नावाजलेली पर्यटनस्थळेही दुर्लक्षित आहेत. अशा  स्थळांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडणे, त्या ठिकाणी हॉटेल्स उभारणीचे काम प्राधान्यक्रमाने करणे अपेक्षित आहे. 

इकडे लक्ष द्या
निसर्ग पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर धार्मिक, संग्रहालय, सांस्कृतिक उत्सवाचा आस्वाद घेऊन लोकांना आनंदाने नियोजित स्थळी पोहोचायचे असते. मात्र, अशा ठिकाणी जाण्यासाठी, राहण्यासाठी सोय, रस्ते, पाणी, वीज, पंखे, आरोग्याच्या सुविधाच नाहीत. संबंधित स्थळाची माहिती देणारा गाइड नसतो. विदर्भाची जमीन, जंगल आणि जल पाहता स्वतंत्र पर्यटन धोरणाची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com