साहित्य संमेलनासाठी दिल्ली-विदर्भात चुरस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

निर्णय सप्टेंबरमध्ये - महामंडळाने केली स्थळ निवड समितीची घोषणा; निवडक स्‍थळांना देणार भेटी 
नागपूर - आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदासाठी महामंडळाकडे सहा प्रस्ताव आले असले तरी दिल्ली आणि विदर्भातील बुलडाणा व अमरावती अशा तीन ठिकाणांमध्ये चुरस असेल, असे चित्र आहे. आज झालेल्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने स्थळ निवड समितीची घोषणा केली असून, पुढील दोन महिन्यांत निवडक स्थळांना ही समिती भेट देणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी येथून आलेला प्रस्ताव महामंडळाने नेहमीप्रमाणेच फारसा ‘सिरीयसली’ घेतलेला नाही. याशिवाय गेल्या पाच वर्षांत दोन संमेलने पुण्याच्या अखत्यारित झाल्यामुळे शिरूरबाबत साशंकता आहे. बृहन्महाराष्ट्रातून दिल्ली आणि बडोदा अशा दोन ठिकाणांचे प्रस्ताव आले आहेत. यात दिल्लीचा प्रस्ताव अधिक दमदार असल्याने व ६४ वर्षांचा बॅकलॉग असल्याने स्थळ निवड समितीच्या दौऱ्यात राजधानी अग्रक्रमावर असण्याची शक्‍यता आहे. इतर दोन प्रस्ताव विदर्भातील बुलडाणा व अमरावती या जिल्ह्यांमधून आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत एकही अखिल भारतीय साहित्य संमेलन झालेले नाही. मेहकर तालुक्‍यात असलेल्या हिवरा येथील विवेकानंद आश्रमाने तयारी दाखविली आहे. हजारो पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याची क्षमता असल्याचे हिवराआश्रमने यापूर्वीच सिद्ध केले आहे. तर गेल्या २५ वर्षांमध्ये अमरावतीलाही यजमानपदाचा मान मिळू शकलेला नाही. त्यामुळे अमरावतीदेखील प्रबळ दावेदार आहे. परंतु, यापैकी कुठल्या स्थळांना समिती भेट देईल, हे अद्याप ठरलेले नाही. आर्थिक आणि सोयी-सुविधांच्या दृष्टीने सक्षम असलेल्या स्थळांचा अहवाल तयार करून सप्टेंबरमध्ये होणाऱ्या महामंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येईल. त्याच बैठकीत संमेलन स्थळावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी आज पत्रकार  परिषदेत दिली. स्थळ निवड समितीत डॉ. श्रीपाद जोशी, डॉ. विलास चिंतामण देशपांडे, डॉ. इंद्रजित ओरके आणि सुधाकर भाले यांच्यासह उज्ज्वला मेहंदळे, दादा गोरे आणि प्रकाश पायगुडे यांचा समावेश असेल. 

बृहन्महाराष्ट्रातील मराठीची स्थिती
सीमावर्ती व बृहन्महाराष्ट्रातील मराठीची सद्य:स्थिती जाणून घेणे व त्यावरील अहवाल राज्य सरकारला देणे, या कामांसाठी आज समिती स्थापन करण्यात आली. ही समिती विविध ठिकाणी विशेष अभ्यास दौरा करून त्यावरचा अहवाल तयार करेल. यात चार पदसिद्ध अधिकाऱ्यांसह कौतिकराव ठाले पाटील, मिलिंद जोशी आणि अनुपमा उजगरे यांचा समावेश असेल.