संजय महाकाळकर नव्हते मान्यताप्राप्त नगरसेवक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

नागपूर - नगरसेवक संजय महाकाळकर हे कधीही मान्यताप्राप्त विरोधी पक्ष गटनेता नव्हते. तसेच त्यांच्या नियुक्तीला महापौरांनीदेखील मान्यता दिलेली नव्हती. मुख्य म्हणजे त्यांना मान्यता प्राप्त झाल्याचा एकही पुरावा उपलब्ध नसल्याचा दावा बुधवारी (ता. १९) तानाजी वनवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केला. 

वनवे यांच्या विरोधी पक्ष गटनेतेपदाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. दोन दिवस महाकाळकर यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता  सुरेंद्रकुमार मिश्रा यांनी युक्तिवाद केला. यानंतर वनवे यांच्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुनील मनोहर यांनी युक्तिवादाला सुरुवात केली आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार वनवे यांची गटनेता पदावरील नियुक्ती नियमानुसार झाली आहे. वनवे यांना बहुसंख्य नगरसेवकांचा पाठिंबा आहे. त्यामुळे महाकाळकर हे गटनेतापदी कायम राहू शकत नाहीत. विभागीय आयुक्तांनी वनवे यांच्या बाजूने दिलेला निर्णय वैध आहे, असा दावाही मनोहर यांनी केला. त्यांचा युक्तिवाद अपूर्ण असून ते उर्वरित युक्तिवाद गुरुवारी करणार आहेत. महानगरपालिकेत काँग्रेसचे २९ नगरसेवक आहेत. सुरुवातीला महाकाळकर यांची निर्धारित प्रक्रियेद्वारे गटनेतापदी निवड करण्यात आली होती. त्यांनी गटनेतेपदाची सूत्रे स्वीकारून कामाला सुरुवात केली होती. 

दरम्यान, महाकाळकर यांच्याविरुद्ध १६ मे रोजी वर्धा मार्गावरील प्रगती भवन येथे नगरसेविका हर्षला साबळे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नगरसेवकांची बैठक  झाली. त्यात वनवे यांची गटनेतापदी निवड करण्याचा निर्णय घेऊन, विभागीय आयुक्तांना १७ नगरसेवकांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यात आले. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी १९ मे रोजी वादग्रस्त आदेश जारी  केला. त्याद्वारे महाकाळकर यांना गटनेता पदावरून कमी करून वनवे यांची गटनेतापदी निवड  ग्राह्य धरण्यात आली. याप्रकरणी महापालिकेतर्फे ॲड. जेमिनी कासट कामकाज पाहत आहे.