कोराडीतील ‘संस्कृती ग्राम’ राज्य सरकारने रोखले!

नितीन नायगावकर
मंगळवार, 25 जुलै 2017

दक्षिण मध्यचा प्रकल्प - ७० एकर जागेची मंजुरी रद्द, नव्या जागेचा शोध

नागपूर - दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘शिल्पग्राम’ला कोराडी येथे ७० एकर जागा देण्याचे महाराष्ट्र सरकारने कबूल केले होते. त्यासाठी आवश्‍यक सर्व कार्यवाही पार पडली होती. मात्र, संबंधित जागा केंद्राच्या नावावर करण्यापूर्वीच राज्य सरकारने यातून काढता पाय घेतला आणि ‘त्या’ जागेची मंजुरीही रद्द केली, असे केंद्राच्या अधिकृत सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले.

दक्षिण मध्यचे तत्कालीन संचालक डॉ. पीयूष कुमार यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून कोराडी मंदिराच्या मागे ७० एकर जागा मंजूर करून घेतली होती. त्यासाठी बऱ्याच बैठका  झाल्या. त्यानंतर उदयपूरचे शिल्पग्राम आणि हैदराबादचे शिल्परामम यांच्या धरतीवर कोराडी येथे मंदिराच्या मागे ७० एकर जागेत ‘संस्कृती ग्राम’ उभारण्याचा निर्णय झाला. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रच हे शिल्पग्राम उभे करणार होते. त्यासाठी केवळ जागेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. अथक प्रयत्नांनंतर राज्य सरकारने जागा मंजूर केली आणि आवश्‍यक कार्यवाही पार पाडली. गेल्यावर्षी जुलै महिन्यातच ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली होती. केवळ संबंधित जागा केंद्राच्या नावावर होणे बाकी होते. मात्र, दरम्यानच्या काळात कुठे माशी शिंकली कुणालाच कळले नाही. केंद्राच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, राज्य सरकारने यातून माघार घेतली असून आता नवीन जागा शोधू, असे आश्‍वासन दिले आहे, मात्र अद्याप यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्याचवेळी ‘संस्कृती ग्राम’ला राज्य सरकारकडून जागा मिळेल, हे निश्‍चित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

यापूर्वी, केंद्राच्या मागील भागात वापरात नसलेली सार्वजनिक बांधकाम विभागाची दोन एकर जागा राज्य सरकारकडे मागितली होती. त्यासंदर्भातील प्रस्ताव त्यांनी सरकारला दिला होता. केंद्राचा व्याप वाढविण्यासाठी सध्या असलेली चार एकर जागा अपुरी पडत असल्याचे कारण त्यांनी नमूद केले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जागा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर  पीयूष कुमार यांनी शहराच्या बाहेर ‘संस्कृती ग्राम’ उभारण्यासाठी जागा मिळावी, अशी मागणी  केली आणि ती मान्य झाली. पण, नव्या जागेचे आश्‍वासन देऊन राज्य सरकारने प्रस्तावित जागेची मंजुरी रद्द केली.

अशी आहे संकल्पना
पाच हजार आसनक्षमता असलेला खुला रंगमंच
ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या झोपड्या
लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिल्पाकृती
पर्यटकांना खुणावेल अशा केंद्राची निर्मिती