संमेलनाध्यक्षपद सन्मानाने बहाल करावे का?

नितीन नायगांवकर
गुरुवार, 1 जून 2017

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने बहाल करता येईल का, यासंदर्भात घटनादुरुस्ती समितीच्या बैठकीच्या निमित्ताने महामंडळात विचार प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शनिवारी (ता. 3) नागपुरात यावर प्राथमिक चर्चा होईल. त्यानंतर सर्व घटक संस्थांमध्ये ही चर्चा घडवून निवडणूक प्रक्रियेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे.

नागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने बहाल करता येईल का, यासंदर्भात घटनादुरुस्ती समितीच्या बैठकीच्या निमित्ताने महामंडळात विचार प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शनिवारी (ता. 3) नागपुरात यावर प्राथमिक चर्चा होईल. त्यानंतर सर्व घटक संस्थांमध्ये ही चर्चा घडवून निवडणूक प्रक्रियेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने व्यवहार, संमेलन व संमेलनाध्यक्ष निवडणूक आदींच्या बाबतीत काही घटनात्मक बदल करण्याचा प्रस्ताव आणला होता. यावर विचार होऊन योग्य बदलासाठी घटनादुरुस्ती समितीची स्थापना करण्यात आली. मराठवाड्याचे कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वात या समितीने विविध विषयांचा विचार केला. येत्या शनिवारी या विषयांवर चर्चा होणार आहे. यात संमेलनाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असेल.

मराठी साहित्य संमेलन म्हटले की खर्च आणि अध्यक्षपदाची निवडणूक या दोनच गोष्टींची चर्चा होते. त्यावरून दरवर्षी वादही होतात.

कुरघोडीच्या बातम्या माध्यमांमध्ये येतात. साहित्य क्षेत्रातील राजकारण या माध्यमातून सर्वसामान्यांपुढे येते. शिवाय निवडणूक प्रक्रिया कितीही पारदर्शी करायचा प्रयत्न झाला तरीही त्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीका होताना दिसतेच. त्यामुळे संमेलनाध्यक्षपद सन्मानाने बहाल करण्यात आले तर प्रक्रियेचा प्रश्‍नच उरणार नाही, असा विचार पुढे आला.

शिवाय संमेलनाध्यक्ष सन्मानानेच निवडावा, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. घटनादुरुस्ती समिती नेमका याच विषयाचा विचार करत आहे. अखिल भारतातील घटक संस्थांनी या प्रस्तावाला मान्यता दिली, तर कदाचित संमेलनाध्यक्षपदाची निवडणूकच भविष्यात होणार नाही, असाही प्रयत्न सुरू आहे. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने बहाल करण्यात येते. शिवाय घटक संस्थांच्या संमेलनांचे अध्यक्षही सन्मानानेच निवडण्यात येतात. याचा आदर्श महामंडळाने ठेवावा, अशी सूचना गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य वर्तुळातून येत आहे. अनेकांनी भाषणांमधूनही अपेक्षा व्यक्त केली; पण महामंडळाच्या पातळीवर यंदा प्रथमच त्यावर ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.

साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात विचार सुरू आहे. संमेलनाध्यक्षपद सन्मानाने बहाल करावे का, असाही विचार पुढे आला आहे. घटनादुरुस्ती समिती या प्रस्तावावर चर्चा करणार आहे.
- कौतिकराव ठाले-पाटील, घटनादुरुस्ती समिती, साहित्य महामंडळ