श्‍याम हॉटेल भारतीय पुरातत्त्वाकडे सोपविणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

नागपूर - सिताबर्डीवरील श्‍याम हॉटेलच्या इमारतीसह या जागेचा ताबा भारतीय पुरातत्त्व कार्यालयाकडे देण्यात येणार आहे. याबाबत कार्यवाहीचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात येईल. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा मार्ग मोकळा होणार आहे.

नागपूर - सिताबर्डीवरील श्‍याम हॉटेलच्या इमारतीसह या जागेचा ताबा भारतीय पुरातत्त्व कार्यालयाकडे देण्यात येणार आहे. याबाबत कार्यवाहीचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात येईल. येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा मार्ग मोकळा होणार आहे.

सीताबर्डी येथील श्‍याम हॉटेल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागविणारे श्रद्धास्थान आहे. या हॉटेलला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा, अशी मागणी शहरातील आंबेडकरी जनतेने लावून धरली होती. ही जागा महापालिकेच्या मालकीची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यास महापालिका सभागृहाने मागीलवर्षी डिसेंबरमध्ये मंजुरी दिली. त्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला. मनपाच्या ठरावावर पुनर्विचार करून केवळ राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित करण्याचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत श्‍याम हॉटेलच्या इमारतीसह जागा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण कार्यालयाकडे सोपविण्याबाबत कार्यवाहीचे अधिकार आयुक्तांना प्रदान करण्याचा प्रस्ताव येणार आहे.

प्रस्तावाला सात महिने विलंब
श्‍याम हॉटेलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यास महापालिका सभेने डिसेंबर २०१६ मध्ये मंजुरी दिली. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे तत्काळ पाठविला. राज्य शासनाने मार्च २०१७ मध्ये महापालिकेला पत्र लिहून एखादी वास्तू राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्यास, त्याचा ताबा भारतीय पुरातत्त्व विभागाकडे जातो. त्यामुळे ही जागा महापालिका मोबदला देऊन ताब्यात घेऊ शकत नाही, असे सूचविले. नव्याने ठराव पाठविण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर सात महिन्यांनी महापालिका प्रशासनाने प्रस्ताव तयार केला. 

लीज रद्द करणार 
राष्ट्रीय संरक्षित स्मारकासाठी प्रस्तावित जागा ७ हजार ५०० चौरस फूट आहे. ही जागा आस्वाद रेस्टॉरंट प्रा. लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद लक्ष्मीनारायण जयस्वाल यांना एप्रिल २००४ मध्ये ३० वर्षांच्या लीजवर देण्यात आली. राज्य शासनानेही राष्ट्रीय संरक्षित स्मारकाला हिरवी झेंडी दाखविल्यास लीज रद्द करण्याची तसेच नियमानुसार मोबदलाही देण्याचीही महापालिकेची तयारी आहे.

‘सकाळ’ने दिला लढा 
सिताबर्डीतील श्‍याम हॉटेलचे रूपांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संरक्षित स्मारकात होण्यासाठी ‘सकाळ’ने लढा दिला. सातत्याने वृत्त, वृत्तमालिकेद्वारे प्रशासन, सत्ताधारी व राज्य शासनाचेही लक्ष वेधले. त्याची दखल घेत महापालिकेने मागीलवर्षी डिसेंबरमध्ये श्‍याम हॉटेलला राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित करण्याचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली.

‘सकाळ’ने असा केला पाठपुरावा 
१३ एप्रिल २०१२ - श्‍याम हॉटेलला लावा आनंद ‘फॉर्म्युला’
१४ एप्रिल २०१२ - श्‍याम हॉटेलच्या स्मारकासाठी पालिकेचा पुढाकार - महापौर अनिल सोले यांची घोषणा
१५ एप्रिल २०१२ - श्‍याम हॉटेलसाठी सर्वपक्षीय बैठकीचा वृत्तांत प्रकाशित
२० एप्रिल २०१२ - श्‍याम हॉटेल दीक्षा स्मृतिभवन घोषित करण्याची आंबेडकरी जनतेची मागणी
२४ एप्रिल २०१२ - श्‍याम हॉटेल होणार डॉ. आंबेडकरांचे स्मारक (महापालिकेच्या महासभेत होणार ठराव)
२७ एप्रिल २०१२ - उपमहापौर संजय जाधव यांनी मागवले श्‍यॉम हॉटेलचे ऐतिहासिक संदर्भ
३० एप्रिल २०१२ - श्‍याम हॉटेल राष्ट्रीय स्मारक करण्याचा महापालिकेचा ठराव संमत 
२०१२ पासून तर २०१७ सालापर्यंत वाचकांनी केलेल्या आंदोलनाला ‘सकाळ’तर्फे सातत्याने पाठबळ देण्यात येत आहे. यामुळेच अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्‍याम हॉटेल पुरातत्व विभागाकडे देण्यासंदर्भात वक्तव्य केले.

Web Title: nagpur vidarbha news shyam hotel give to Indian archaeologist