सुपर स्पेशालिटीत सहा अतिदक्षता विभाग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

सुपर स्पेशालिटी मुळात संशोधन संस्था तयार करण्याचा शासनाचा उद्देश होता. हा उद्देश आता सफल होत आहे. या वर्षी हृदयरोग विभाग आणि गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी विभागात डीएम अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. यामुळे पदव्युत्तर संस्थेचा दर्जा प्राप्त झाल्याने विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मोलाचे सहकार्य मिळत आहे. 
- डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता-मेडिकल-सुपर, नागपूर.

नागपूर - मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पदव्युत्तर शैक्षणिक व संशोधन संस्थेच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सुपर’च्या श्रेणीवर्धनासाठी १०० कोटी देण्याची घोषणा केली. प्रत्येक वर्षी २० कोटींतून विकासाचा अजेंडा राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात सुपरमधील सहा विभागांत पाच खाटांचे असा एकूण ३० खाटांचा अतिदक्षता विभाग तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. 

एप्रिल २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या आशयाचे पत्र मेडिकलमध्ये पोहोचले. १०० कोटींतून दरवर्षी दरवर्षी २० कोटी रुपये मिळतील. यातील ५ कोटी रुपये यंत्रसामग्रीवर व उर्वरित बांधकामावर खर्च करण्यात येतील, अशी माहिती या पत्रातून पुढे आली. यानुसार पहिल्या टप्प्यातील प्रस्ताव तयार झाला आहे.

सीव्हीटीएससह हृदयविकार विभाग, मेंदूरोग विभाग, किडनी विभाग, गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी आणि युरोलॉजी विभागात प्रत्येकी ५ खाटांचा अतिदक्षता विभाग तयार करण्यासाठी आवश्‍यक बांधकाम तसेच इतर खर्चाचा तपशील प्रस्तावात नमूद आहे. या सहा विभागांत नव्याने अद्यायावत तयार होणाऱ्या अतिदक्षता विभागामुळे गरिबांच्या हृदयापासून, तर मेंदू, किडनी, मूत्ररोग, पोटाच्या विकाराशी संबंधित रुग्णांसाठी सुपर वरदान ठरणार आहे.

२४ कोटी ८० लाखांचा प्रस्ताव 
सुपर स्पेशालिटीत सहा विभागांत अतिदक्षता विभाग तयार करण्याचा २४ कोटी ८० लाख रुपयांचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला शासनाची हिरवी झेंडी मिळाल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात झाली. याशिवाय यापूर्वी न्यूरोसर्जरीसह तीन ओटी तयार करण्यात येत असून, प्रत्येक ओटीत स्टेनलेस स्टीलचे पत्रे लावून ‘ओटी’ बॅक्‍टेरिया फ्री केली जाणार आहे. तीनही ओटींसाठी ६ कोटींचा खर्च झाला आहे.