स्वातंत्र्यदिनापासून संत्रानगरी स्मार्ट व सेफ सिटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

नागपूर - शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणारा स्मार्ट ॲण्ड सेफ सिटी प्रकल्प पूर्ण झाला असून, येत्या स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट ॲण्ड सेफ सिटीमुळे संत्रानगरी हायटेक होणार असून, महापालिकेतील संचालन करणाऱ्या केंद्राचे कामही पूर्ण झाले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्याचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय गौतम यांनी दोन जून रोजी महापालिका अधिकारी, पोलिस अधिकारी आणि स्मार्ट ॲण्ड सेफ सिटी प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या एल ॲण्ड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत शहरातील स्मार्ट ॲण्ड सेफ सिटी प्रकल्पाच्या कामाची गती वाढवून येत्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश गौतम यांनी एल ॲण्ड टी या कंपनीला दिले. एल ॲण्ड टी कंपनीच्या मंदावलेल्या गतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करीत त्यांना धारेवरही धरले  होते. या प्रकल्पाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. यात उच्च न्यायालय ते खामला या ५.८ किमीच्या स्मार्ट स्ट्रिपच्या कामाचा समावेश आहे. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे केवळ दोन किमीचे काम शिल्लक आहे. मात्र, या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे, वायफायसाठी हॉटस्पॉटचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय स्मार्ट ॲण्ड सेफ सिटी संचालन करणाऱ्या महापालिकेतील केंद्राचे काम  पूर्ण झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाचे लोकार्पण येत्या १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

पोलिसांच्‍या कमांड सेंटरचे काम शिल्लक  
स्मार्ट ॲण्ड सेफ प्रकल्पात पोलिस महत्त्वाचा घटक आहे. यासाठी वेगळे कमांड सेंटर तयार करण्यात येणार आहे. कमांड सेंटर इमारतीच्या बांधकामाला दोन जूनच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या इमारतीचा विस्तृत आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या प्रकल्पातील हे एक मोठे काम शिल्लक आहे.