समृद्धी मार्गासाठी कोरियासोबत 'एसपीव्ही' - देवेंद्र फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

नागपूर - समृद्धी मार्गासाठी कोरिया कर्ज देणार आहे. या मार्गासाठी कोरियाच्या दोन कंपन्या आणि एमएसआरडीसी मिळून एक स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यासंदर्भात कोरियाच्या उपपंतप्रधानांना "ऑफर' दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. या मार्गासाठी कुठेही विरोध नाही, लोकांना विश्‍वासात घेऊनच हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी या वेळी दिली.

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल्वेच्या ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, कोरियाने तेथील सोल व भूचान या शहरात पाचशे किमीचा एक्‍स्प्रेस वे तयार केला. त्यामुळे या कंपन्यांनीही महाराष्ट्रात येऊन एसपीव्ही स्थापन करण्यासंदर्भात चर्चा केली. एवढेच नव्हे, तर सिंगापूर येथील वित्त परिषदेसोबतही चर्चा झाली असून, ते महाराष्ट्रात गुंतवणुकीस तयार आहेत. सिंगापूर येथील चांगी विमानतळ कंपनीशी नागपूर व पुणे विमानतळ विकासासाठी करार झाला. पुणे येथील विमानतळासाठी चांगी विमानतळाचे तंत्रज्ञ काम करतील व एसपीव्ही स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागपुरातील नागपूर महानगर विकास प्राधिकरणाला एक-दोन दिवसांत मंजुरी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फूट ओव्हर ब्रिज आता रेल्वे सेफ्टीमध्ये
रेल्वे खात्यात फूट ओव्हर ब्रिज हे पायाभूत सुविधांमध्ये होते. रेल्वे सुरक्षेच्या नियमात नव्हते. आता मात्र मुंबईतील शुक्रवारी झालेल्या घटनेनंतर फूट ओव्हर ब्रिजही रेल्वे सेफ्टीअंतर्गत अंतर्भूत करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तत्काळ घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.