सेमिस्टरच्या तोंडावर वसतिगृहाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागांच्या अभ्यासक्रमाला जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवात झाली. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही अद्याप विद्यापीठाच्या वसतिगृहातील खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले नाही. त्यामुळे सेमिस्टर परीक्षा जवळ येत असताना विद्यार्थ्यांच्या निवासाचाच प्रश्‍न न सुटल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महिनाभरापूर्वीच पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृहात (अप्पर) वसतिगृह प्रवेशाची प्रावीण्य श्रेणीनुसार यादी लावण्यात आली.

यादीमध्ये नाव असणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी शुल्कही भरले. मात्र, काहींना समितीच्या आदेशानुसार या यादीवर प्रवेश देण्यात येणार नसल्याचे सांगत प्रतीक्षेतच ठेवण्यात आले आहे. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विज्ञान व मानव्यशास्त्र शाखेच्या विविध  विभागांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विदर्भातील विविध भागांतील विद्यार्थी नागपुरात येतात. विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल लॉ कॉलेज चौकातील ‘लोअर’ आणि कॅम्पसजवळील पदव्युत्तर वसतिगृहात प्रवेश मिळविण्याचा असतो. विधी महाविद्यालय वसतिगृहात अवैध विद्यार्थ्यांचा ताबा असल्याने बरेच विद्यार्थी पदव्युत्तर वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करतात. पदव्युत्तर वसतिगृहात अवैध विद्यार्थ्यांचा कोणताही त्रास नसल्याने विद्यार्थ्यांना सहजरीत्या प्रवेशही मिळतो. शिवाय वसतिगृहापासून ‘कॅम्पस’ जवळच असल्याने विद्यार्थ्यांना वाचनालयाचीही सुविधा प्राप्त होते. दरवर्षी पदव्युत्तर वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑगस्ट महिन्यातच पूर्ण व्हायची. मात्र, यंदा सप्टेंबर महिना संपायला केवळ ९ दिवस बाकी असूनही विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोली अलॉटमेंट झाले नाही. अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू असल्याने वसतिगृह अधीक्षकांना विनंती करून विद्यार्थ्यांनी तात्पुरता प्रवेश घेतला. मात्र, कायमस्वरूपी प्रवेश अद्याप मिळालेला नाही. ऑक्‍टोबर महिन्यात पहिल्या व तिसऱ्या सेमिस्टरची हिवाळी परीक्षा होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पात्र विद्यार्थ्यांनाही वसतिगृहात प्रवेश न मिळणे ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारी बाब आहे.

आंदोलनात वसतिगृहाचे नावच नाही
काही दिवसांपूर्वीच विभागांमधील मूलभूत सुविधांसाठी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी जवळपास अडीच तास ‘कॅम्पस’चे प्रवेशद्वार रोखले होते. अनेक कर्मचारी व प्राध्यापकांना प्रवेशद्वाराबाहेरच उभे राहावे लागले होते. यानंतर कुलगुरूंना स्वत: येऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागल्या. समस्यांच्या याद्यांमध्ये आधीच सुटलेल्या अनेक समस्या असल्याने कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना फटकारलेही होते. मात्र, या समस्यांच्या यादीमध्ये कुठेच वसतिगृहातील प्रवेशाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला नव्हता की, कुलगुरूंसोबत  चर्चेवेळी त्याचा उल्लेखही करण्यात आला नव्हता. आंदोलनात सहभागी संघटनेचे अनेक पदाधिकारी वसतिगृहामध्ये वास्तव्यास असून यामध्ये अनेकजण अवैधरीत्या राहत आहेत. वसतिगृहातील समस्या मांडल्यास विद्यापीठाकडून अवैध विद्यार्थ्यांना हटविण्याचा पवित्रा घेतल्या जात असल्याने विद्यार्थी वसतिगृहातील समस्याही प्रशासनापुढे मांडू पाहत नाही.