हे तर भटांनीच लावलेले झाड..!

नागपूर - भट सभागृहाबाबत ‘सकाळ’मध्‍ये प्रकाशित वृत्त.
नागपूर - भट सभागृहाबाबत ‘सकाळ’मध्‍ये प्रकाशित वृत्त.

नागपूर - कविवर्य सुरेश भट यांच्या नावाने नागपुरात झालेले सभागृह म्हणजे त्यांचे कायमस्वरूपी स्मारकच होय, अशी भावना व्यक्त करून भटांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला. ‘बांधतो आपण जिथे घरटी गझलेची... हे भटांनी लावलेले झाड आहे’ या शेरद्वारे गझलकार नितीन देशमुख यांनी फेसबुकवर सभागृहाचे स्वागत केले. केवळ गझलकार नव्हे, तर एकूणच मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सुरेश भटांचे चाहते सर्वदूर आहेत. शिवाय त्यांच्या लेखणीचा समृद्ध वारसा पुढे नेण्याचे कामही शेकडो लोक करीत आहेत. यातील काहींनी व्यक्त केलेला आनंद, त्यांच्याच शब्दांत...

सुरेश भट यांचे मराठी गझलेतील योगदान उत्तुंग आहे. ते गझलेचे खलिपाच होत. त्यांच्या स्मृती सभागृहाच्या माध्यमातून वारंवार जागृत होतील. भटांनी एका लिहित्या पिढीला मार्गदर्शन करून गझल लिहिण्याचे आवाहन केले. त्यांच्या नावाने सभागृह बांधून उपेक्षित अशा गझलेला हक्‍काची प्रतिष्ठा मिळाली. खऱ्या अर्थाने गझल बहरण्यासाठी सभागृहाचे योगदान राहीलच. फक्‍त एकच सांगावेसे वाटते स्व. सुरेश भट स्मृती गझल सभागृह नावाऐवजी ‘स्व. सुरेश भट गझलांगण’ नाव ठेवले असते, तर बरे झाले असते.
- नीलकांत ढोले

‘सकाळ’ नेहमीच अशा बातम्यांची दखल घेत असते, याचा आनंद वाटतो. उद्‌घाटनाला पद्मजाताई येणार याचा आनंद आहेच. पण, आपल्या विदर्भात भट साहेबांच्या जवळची कितीतरी गुणी कलावंत मंडळी आहेत, त्यांचाही सहभाग घेता आला असता. हे सभागृह एखाद्या चांगल्या संस्थेला चालवायला दिल्यास, सभागृहाची निगा उत्तमरीत्या राखली जाईल, अशी सूचना ‘सकाळ’च्या माध्यमातून करावीशी वाटते.
- विष्णू मनोहर
 

वैदर्भी ही प्राचीन संस्कृत साहित्यातील सर्वांत लालित्यपूर्ण आणि म्हणूनच लोकप्रिय शैली असल्याचे उल्लेख ठायीठायी आढळतात. कविकुलगुरू कालिदास यांनीही याच शैलीत लिहिले. सुरेश भट यांनी तोच वारसा पुढे नेत स्वतःचे अढळस्थान मराठी काव्य जगतात निर्माण केले. त्यांच्या नावाचे सभागृह म्हणजे त्यांचा प्राणप्रिय असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे नेमके प्रगटीकरण. भारताच्या मध्यभागी ते नांदावे आणि शुभारंभ राज्यघटनेचे पालक असलेल्या राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावा, हा ‘समसमा संयोग की जाहला’.
- रमा गोळवलकर

मराठी गझलेसाठी आपली अख्खी हयात खर्ची घातलेल्या सुरेश भटांच्या नावाने नागपुरात सभागृह व्हावे, ही अतिशय आनंदाची घटना आणि भटांच्या प्रतिभेला वाहिलेली आदरांजली आहे. नागपूरच्या मातीला भटांच्या प्रतिभेचा सुवास आहेच, तो इथेही दरवळत राहील. भटांनी रुजविलेल्या या अमृताच्या रोपट्याला ज्यांनी खतपाणी घातले आणि खुद्द भटांनीच ज्यांना ही उपाधी बहाल केली त्या भीमराव पांचाळेंचे गाणे यानिमित्ताने होणे अपेक्षित होते. असो. सर्वांचे अभिनंदन.
- किशोर बळी

सुरेश भट यांच्या कवितेवर प्रेम करणाऱ्या त्यांच्या असंख्य चाहत्यांसाठी, ही दिमाखदार वास्तू म्हणजे अभिमानाचाच विषय. ग्रेस आणि भट म्हणजे नागपुरातील माणिक-मोती. आता ग्रेस यांचेही यथायोग्य स्मारक उभे राहायला हवे.
- डॉ. तीर्थराज कापगते

मराठी गझलेसारख्या शक्‍तिशाली काव्यविधेला लोकाश्रय मिळवून देण्याकरिता आदरणीय सुरेश भटांनी केलेल्या धडपडीला व भोगलेल्या कष्टांना हा खरा सलाम आहे. मराठी गझलेवर प्रेम करणाऱ्यांसाठी गझलेचे हक्काचे मंदिर उभे झालेय. 
- नितीन देशमुख

सुरेश भट यांच्याप्रति शहरवासींना असणारा आदर या वास्तूच्या माध्यमातून सदैव व्यक्त होत राहील. पृथ्वी थिएटर, भारत भवन, म्हैसूरचे रंगायन या केवळ वास्तू नव्हे, तर त्या शहरातील सांस्कृतिक परंपरा आहेत. यानिमित्ताने तसेच काहीतरी नागपुरात घडेल.
- अजेय गंपावार

भट यांचे स्थान महाराष्ट्राच्या हृदयात धृवताऱ्यासारखे अढळ आहे. याचा साक्षात अनुभव देणारे सभागृह म्हणजे विश्‍वकर्माच्या वास्तुरचनेसारखा अद्वितीय आविष्कार आहे. सुरेश भट नावाच्या सरस्वती पुत्राचा हा अक्षय सन्मान आहे.
- पवन नालट

हे केवळ सभागृह नसून कलाकारांसाठी, विशेषतः वैदर्भी गझलकारांसाठी हक्काचं घरच आहे, याचा विशेष अभिमान आहे. सर्वांचे अभिनंदन.
- सुधीर बल्लेवार ‘मलंग’

माणसं स्वर्गीय झाली की, त्यांचं मोठेपण जगाला कळतं. जिवंतपणी सुरेश भटांच्या वाट्याला चार दिवसांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील आले नाही. मात्र, ही खंत त्यांच्या जाण्यानंतर का होईना, नागपुरात त्यांच्या नावाने उभारल्या गेलेल्या सभागृहामुळे निवळली. 
- नितीन भट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com