‘डाटा बॅंक’साठी शिक्षकांची माहिती द्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संलग्नित सर्व महाविद्यालयांना नोटीस जारी करून शिक्षकांची यादी पाठविण्याचे आदेश दिले. विद्यापीठ प्रशासन ‘डाटा बॅंक’ बनविण्याच्या कामात आहे. यासाठी विद्यापीठाने गरज भासल्यास शिक्षकांना मूल्यांकन कामात लावण्यासाठी महाविद्यालयांना पाच वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या शिक्षकांची माहिती मागविली. २० नोव्हेंबरपर्यंत ही यादी न पाठविणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने दिला. 

परीक्षा काळादरम्यान मूल्यांकनकर्ते बोलाविणे विद्यापीठासाठी कसरतच ठरते. अनेकदा विद्यापीठ आणि मूल्यांकनकर्त्यांमध्ये वादाची स्थिती निर्माण होते. गत परीक्षांदरम्यान अनेक प्राध्यापकांनी मूल्यांकनासाठी आधी नकार दिला आणि जे प्राध्यापक आले त्यांच्यापैकी अनेकांनी कामात  हयगय केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाने १४० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. महाविद्यालयांचाही विद्यापीठाच्या या निर्णयावर आक्षेप होता. मात्र, प्राचार्यांनी शिकविण्यासाठी प्राध्यापकांची कमतरता असल्याचे स्पष्ट केले. शिवाय नवीन सत्र आणि महाविद्यालयीन कामाचा बोजा अधिक असल्याने अगोदर शिकविणे आणि त्यानंतर मूल्यांकनाचे काम अशी भूमिका घेतली. यामुळे मूल्यांकनासाठी विद्यापीठाला महाविद्यालयांची बरीच मनधरणी करावी लागली. या त्रासापासून वाचविण्यासाठीच विद्यापीठाने डाटा बॅंक तयार करण्याचा निर्णय घेतला. पुढील परीक्षांसाठी मूल्यांकनकर्त्यांची ‘डाटा बॅंक’तयार होणार आहे. त्यामुळे कोणत्या महाविद्यालयात मूल्यांकनासाठी किती प्राध्यापक उपलब्ध आहेत, याची माहिती विद्यापीठाकडे राहील. हिवाळी परीक्षांच्या मूल्यांकनात ही प्रणाली लागू होईल, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

२२ विद्यार्थ्यांमध्ये १ शिक्षक 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमात १ लाख ९१ हजार ८१० आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला ३७ हजार ८२२ जागांवर प्रवेश दिले जातात. एकूण विद्यार्थी संख्या २ लाख २९ हजार ६३२ आहे. तर, दुसरीकडे प्राध्यापकांची संख्या १३९ आहे. यासोबतच अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या २ हजारांच्या जवळपास आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये ही संख्या ८ हजार आहे. अशात सद्यस्थितीत विद्यापीठात प्रत्येक २२ विद्यार्थ्यांमध्ये १ शिक्षक अशी स्थिती आहे.

Web Title: nagpur vidarbha news teacher information for data bank