विद्यापीठाच्या अधिसूचनेत बऱ्याच त्रुटी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

अभाविपचा आरोप; संस्थाचालकांना मदत करण्याचा छुपा अजेंडा
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका नवीन कायद्यानुसार होऊ घातल्या आहेत. याची अधिसूचनादेखील काढण्यात आली. यामध्ये अनेक त्रुटी असून, थेट संस्थाचालकांना फायदा पोहोचविण्याचा विद्यापीठाचा हेतू आहे, असा अरोप करीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या शिष्टमंडळाने प्रांतमंत्री विक्रमजित कलाने यांच्या नेतृत्वात कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेतली.

प्रांत संघटनमंत्री शैलेंद्र दळवी यांनी विद्यापीठाच्या कारभारावर टीका करीत विद्यापीठाच्या अधिसूचनेवर प्रश्‍नचिन्ह उभे केले. नवीन विद्यापीठ कायद्याला तडा देऊन बोगस मतदार नोंदणी वाढविण्यासाठी कुलगुरूंनी पदवी प्रमाणपत्राव्यतिरिक्त तात्पुरत्या प्रमाणपत्राला मान्यता दिली. तसेच नोंदणी मुंबई विद्यापीठाप्रमाणे नि:शुल्क करावी, ‘ए’ आणि ‘बी’ फोरम एकच असावा, ऑनलाइनसोबत ऑफलाइन नोंदणीदेखील करावी, असेही सांगितले.
२०१५ साली कुठलीही नोंदणी झाली नसूनही विद्यापीठ नोंदणी झाल्याचे सांगत आहे. त्यामुळे ऑनलाइन झालेल्या नोंदणीचा तपशील विद्यापीठाने त्वरित जाहीर करावा आणि महिला मतदारांची नोंदणी करताना सासरचा पत्ता आणि ओळखपत्र ग्राह्य धरण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. मात्र, या प्रश्‍नांवर थेट उत्तर न देताना कुलगुरूंनी मुद्द्यांना बगल देत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला.
 
...अन्यथा तीव्र आंदोलन
दोन दिवसांत कुलगुरूंनी या मागण्यांवर योग्य निर्णय न घेतल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र आंदोलन करेल आणि होणाऱ्या संभाव्य परिणामांना विद्यापीठ जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला. या वेळी नागपूर महानगर अध्यक्ष प्रा. सचिन रणदिवे, मंत्री रवी दांडगे, डॉ. संजय येल्लुरे व वैभव बावनकर उपस्थित होते.