नवजात शिशूंचे मृत्यू रोखण्यासाठी तीन अतिदक्षता विभाग - डॉ. दीपक सावंत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नागपूर - नवजात शिशूंचा मृत्युदर कमी करण्यासाठी राज्यात तीन नवजात शिशू अतिदक्षता विभाग (एनआयसीयू) तयार करण्यात येतील. यातील दोन विदर्भातील अमरावती व चंद्रपूर येथे, तर एक नाशिकमध्ये तयार करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी दिली.

उपराजधानीत डागा स्मृती शासकीय रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आले असता डॉ. सावंत  यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात मेळघाट असो की, गडचिरोली, नंदुरबार व पालघर येथे अतिदक्षता विभागात मुदतपूर्व जन्मलेले व अपुऱ्या वजनाचे (किलोभर वजनापेक्षा कमी) नवजात शिशू दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. 

राज्यातील नवजात बालकांचे मृत्यूचे प्रमाण १२  टक्के आहे. डागा रुग्णालयात कमी वजनाची व मुदतपूर्व जन्मलेल्या नवजात शिशूंना वाचविण्यात यश आले आहे. डागा रुग्णालयाच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे येथे खाटांची संख्या वाढविण्याच्या प्रस्तावाला हिरवी झेंडी दिल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

नवजात शिशूंच्या भरती होण्यावर इनक्‍युबेटरची संख्या अवलंबून असते. त्यासाठी केंद्र शासनाने निकष ठरवून दिले आहेत. गडचिरोली, मेळघाट, पालघर नाहीतर राज्यातील नवजात शिशूंच्या मृत्यूचे (डेथ ऑडिट) विश्‍लेषण करण्यासाठी न्युओमेटॉलॉजिस्ट तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या समिती तयार केली आहे. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर रुग्णालयात टर्शरी कॅन्सर केअर सेंटरचा दर्जा देत ५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. १० कोटींचे अनुदान राज्यशासनातर्फे दिले, असेही डॉ. सावंत म्हणाले.

कुपोषण नियंत्रणासाठी सरपंचांची मदत
राज्यात जेथे कुपोषणाचे प्रमाण जास्त आहे, अशा परिसरात सरपंचांची मदत घेण्यात येईल. सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि पोलिस पाटील यांच्या समन्वयातून गावातील कुपोषणाची माहिती संकलित केली जाईल. प्रत्येक घरातील गर्भवतीची माहिती संकलित करण्यासाठी आशा वर्कर दिवसाआड घरोघरी भेट देईल. 

विशेष ‘हिमोग्लोबीन ड्राईव्ह’ घेण्यात येईल. येथील माणसांना परिसरात रोजगार देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर कुपोषण निर्मूलन होण्यास मदत होईल. तर या भागातील माता व बाल मृत्यूचा दर नियंत्रणात असेल, असा विश्‍वास डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.

मंत्री महोदय अनभिज्ञ
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरात १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे छेडताच आरोग्यमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी जागा निश्‍चित झाल्याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचा गौप्यस्फोट केला. जिल्हा रुग्णालयाच्या जागा निश्‍चितीच्या माहितीपासून आरोग्यमंत्री अनभिज्ञ असल्यामुळे सारेच आरोग्य विभागाचे अधिकारी एकमेकांकडे आश्‍चर्याने बघत राहिले.