तंबाखू, खर्ऱ्यावर पुन्हा बंदी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

नागपूर - कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता गुटखा, तंबाखूसोबत खर्ऱ्यावर पुन्हा वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली आहे.

नागपूर - कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता गुटखा, तंबाखूसोबत खर्ऱ्यावर पुन्हा वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली आहे.

तंबाखूजन्य पदार्थांमुळे ॲक्‍युट हायपर मॅग्नेशिया, हृदयरोग, ओरल सबम्युकस फायब्रोसिस, मुखाचा कर्करोग, ल्युक्‍योप्ल्याकिया, अन्न नलिकेचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, मेटाबॉलिक अबनॉरलिटी, प्रजनन स्वास्थ्य व आरोग्य, जठर, आतडे व श्‍वसन या संबंधाचे आजार होतात. टाटा मूलभूत संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनात कर्करोग तंबाखूमुळे होत असल्याचे दिसून आले. त्याच प्रमाणे शासकीय दंत महाविद्यालयानेही गुटखा पानमसाल्यामुळे ओरल सबम्युकस फायब्रोसिस आजार होत असल्याचे स्पष्ट केले आहे. या शिवाय विविध संस्थांच्या संशोधनातही गुटखा, तंबाखूमुळे मुखाचा कर्करोग असल्याचे म्हटले. यामुळे अनेकांचे जीवन उद्‌ध्वस्त झाले असून जीवही गेला आहेत. गुटखा, तंबाखू, पानमसाला, खर्ऱ्याच्या विक्रीवर शासनाकडून २०१३ मध्ये बंदी घालण्यात आली आहे. काहींनी शासनाच्या या निर्णयाला आव्हानही दिले होते. त्यामुळे शासनाकडून एका वर्षासाठीच बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा शासनाने वर्षभरासाठी विक्रीवर बंदी घातली आहे. २० जुलैपासून ही बंदी घालण्यात आली आहे.

१०६ कोटींचा प्रतिबंधित तंबाखू जप्त
गेल्या पाच वर्षात १०६ कोटींचा प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला. वर्ष २०१२-१३ ला २०.७४ कोटी, वर्ष १३-१४ ला १५.६६, वर्ष १४-१५ ला १७.५३ कोटी, वर्ष १५-१६ ला २१.८१ तर वर्ष १६-१७ ला २२.९८ कोटींचा प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आला.

सुगंधित सुपारीवरील बंदीसाठी समिती
सुगंधित सुपारी आरोग्यास हानिकारक असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या विक्रीवर शासनाकडून बंदी घालण्यात आली होती. मात्र, यालाही आव्हान देण्यात आले. त्यामुळे याच्या विक्रीवर बंदी घालण्यासाठी राज्य शासनाकडून एक समिती गठित करण्यात आली आहे. 

शासनावर आर्थिक बोजा
तंबाखूमुळे होणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी शासनावरही कोट्यवधींचा खर्च येतो. कर्करोग, क्षयरोग, श्‍वसनाचे विकार, हृदयविकार यांच्यावर ७६९ कोटी रुपयांचा खर्च येतो. यात हृदयरोगासाठी आर्थिक बोजा ४४९ कोटी, क्षयरोगासाठी ९८ कोटी, श्‍वसनाच्या विकारासाठी १५४ कोटी तर कर्करोगासाठी ६८ कोटींचा खर्च करण्यात येतो. धूम्रपानविरहित तंबाखूसेवनामुळे महिलांच्या उपचारावर ७० कोटीचा खर्च येतो.