प्रशिक्षणासाठी हवाय्‌ ४५ वर्षांखालील तज्‍ज्ञ शिक्षक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

अभ्यासक्रमासाठी अनुभवी शिक्षक
पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी गठित केलेल्या अभ्यासमंडळ आणि लेखक मंडळामध्ये ४५  वर्षांपेक्षा जास्त वय असलेले अनुभवी शिक्षक निवडण्याचे काम विद्या प्राधिकरणाकडून करण्यात आले. विशेष म्हणजे यात काही खासगी शिकवणी वर्गातील शिक्षकांचा समावेश केला होता. असे असताना प्रशिक्षणासाठी ४५ पेक्षा कमी वयाचे तज्ज्ञ शिक्षकच का? असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे.

नागपूर - दहावीच्या अभ्यासक्रमात यंदापासून बदल केले आहेत. त्यासाठी विद्या प्राधिकरणाकडून विभाग ते तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यंदा प्रथमच शाळा सुरू होण्यापूर्वी विभागाकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. मात्र, प्रशिक्षणासाठी दहा वर्षांचा अनुभव आणि ४५ वर्षांखालील तज्ज्ञ शिक्षक असावा, अशी विचित्र अट टाकण्यात आल्याने शिक्षकांचा भुवया उंचावल्या आहेत. 

दहावीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाचे शिक्षक प्रशिक्षण विभागास्तरावर पाच तर तालुकास्तरावर नऊ एप्रिलमध्ये होणार. तालुकास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे विभागस्तरावर प्रशिक्षण घेतले जाईल. ज्या शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करायचे  आहे, त्यांना दोन एप्रिलपर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नोंदणी करणाऱ्या शिक्षकाचे वय ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे, अशी अट यंदापासून लादली आहे. प्रशिक्षणासाठी जेवढा शिक्षक अनुभवी असला तेवढेच अधिक शिक्षक प्रशिक्षित होतात. दरवर्षी प्रशिक्षणात ज्येष्ठ शिक्षकांचाच समावेश केला जातो.

मात्र, यावर्षी प्रशिक्षणात ४५ वर्षांची अट टाकण्याचा शासनाचा नेमका हेतू काय? हे शिक्षकांना कळायला मार्ग नाही. त्यामुळे अनेक ज्येष्ठ शिक्षकांच्या गाठीशी असताना, त्यांना त्यांच्यापेक्षा कमी अनुभव असलेल्या तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे ४५ वर्षांपेक्षा जास्त वय असल्याने इच्छा असतानाही बरेच शिक्षक तज्ज्ञ मार्गदर्शकाचे काम करू शकणार नाही.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण होत आहे, ही आनंदाची बाब आहे. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी वयाची अट ठेवणे ही बाब कुठल्या नियमाअंतर्गत ठेवली ती कळत नाही. ही अट रद्द करण्यात यावी. 
- पुरुषोत्तम पंचभाई, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ

Web Title: nagpur vidarbha news training expert teacher