निर्यातबंदी उठवल्याने वाढले तूर, उडीद डाळींचे दर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - केंद्र सरकारने तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी उठवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या डाळीसह कडधान्यांच्या भावात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली. यामुळे शेतमालाला हमी भावापेक्षा जास्त बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिणामी, सणासुदीच्या दिवसात सामान्य नागरिकांचा खिसा हलका होणार आहे. 

गेल्या वर्षी खरिपात तुरीचे बंपर उत्पादन झाल्याने सर्वच डाळी हमी भावाच्याही खाल्या गेल्या. त्यामुळे डाळी निर्यातीवरील निर्बंध उठविण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत होती.

अखेर गेल्या दहा वर्षांपासूनची तूर, उडीद आणि मूग डाळींवरील निर्यातबंदी केंद्र सरकारने उठविली आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांना रास्त दर मिळेल व जास्त कडधान्य उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल, असे ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप मोटवानी यांनी सांगितले. 

दहा वर्षांपूर्वी देशांतर्गत उत्पादनातील घट आणि डाळींच्या वाढत्या दराच्या पार्श्‍वभूमीवर निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर डाळींचा मुबलक पुरवठा झाल्यानंतरही निर्यातबंदी मागे घेण्यात आली नाही. उलट, सरकारने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात डाळी आयात केल्या. त्यामुळे देशांतर्गत डाळीचे दर घसरून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला. गेल्या वर्षी देशात कडधान्यांचे बंपर उत्पादन झाले आहे. परिणामी दर घसरले. त्यामुळे डाळींवरील निर्यातबंदी उठविण्याची मागणी करण्यात आली होती. 

शेतकऱ्यांना मिळणार चांगला भाव
अखेर प्रदीर्घ काळानंतर निर्यातबंदी उठविण्यात आली आहे. त्यामुळे यंदा डाळींची निर्यात होईल आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे. सर्वसामान्य ग्राहकांना मात्र सणासुदीच्या दिवसात खिसा थोडा रिता करावा लागणार आहे.

केंद्राच्या निर्णयाचे स्वागत
डाळींवरील निर्यातबंदी उठविल्यामुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळणार आहे. केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह असल्याचेही प्रताप मोटवानी म्हणाले. विदर्भातील डाळमिल उद्योगाला नवचैतन्य मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: nagpur vidarbha news tur udid dal rate increase