उमरेड - चारचाकीचालकाने दिलेल्या धडकेत चक्‍काचूर झालेली चारचाकी.
उमरेड - चारचाकीचालकाने दिलेल्या धडकेत चक्‍काचूर झालेली चारचाकी.

अनियंत्रित चारचाकीच्या धडकेत दोघांचा मृत्यू

तीन वाहनांना दिली धडक : ८ जण गंभीर जखमी 

उमरेड - सुसाट निघालेल्या टाटा सुमोने पेट्रोलपंपाजवळ स्कूटीला धडक दिल्याने स्कूटीवरील दोन महिला, एक मुलगा जखमी झाले. तर रौनक माने या चार महिन्यांच्या चिमुकल्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. इतर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. एवढे झाल्यानंतरही मागेपुढे न बघता भरधाव निघालेल्या चालकाने रस्त्यातील इतर दोन चारचाकी व दुचाकीला धडक दिल्याने दुसऱ्या कारचालकाचा मृत्यू झाला व त्याबरोबरच कारमधील आठ प्रवासी जखमी झाले. 

रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास स्कूटीला अनियंत्रित कारने धडक दिल्यानंतर बालकाचा मृत्यू झाला. शेजारून जात असणाऱ्या दुचाकीलाही कारने जबर धडक दिली. यात दुचाकीवरील पती, पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना उपाचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. हीच चारचाकी पुढे भरधाव जात असताना गांगापूर चौकामध्ये नागपूरवरून ब्रह्मपुरीला साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या एका चारचाकीला धडक दिली.

या कारमध्ये डॉ. ईश्‍वर मोहुर्ले आणि त्यांचे  कुटुंबीय होते. अनियंत्रित चारचाकीची गाडीची गती बघता मोहुर्लेने कशीबशी गाडी वाचविण्याच्या प्रयत्न केला. तरीही होंडा कारच्या मागील भागास सुसाट चारचाकीने धडक दिली. सुदैवाने गाडीतील प्रवाशांना कुठलीच इजा पोहोचली नाही. मात्र, कारचे नुकसान झाले. त्यांच्या मागाहून ओमनी कार नागपूरवरून काही मंडळी घेऊन येत होती. या ओमनीवर सुसाट कार जाऊन आदळल्याने ओमनीचालक रवींद्र उदाराम गिरडक (वय ४५, गांगापूर) यांचा मात्र जागीच मृत्यू झाला. ओमनीतील प्रवासी गंभीर असल्याची माहिती आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार अनियंत्रित सुमोचा वाहनचालक हा मद्यप्राशन करून असल्याचे सांगण्यात येते. तो गांगापूर येथील रहिवासी असल्याचे कळते. गंभीर जखमीमध्ये गुणवंत माने(वय २३), उज्ज्वला माने (वय २५), राजकुमार यादव, सुरेश कुमार यादव, मंगला वासनिक (वय ४३, नागपूर), राजेश मलिक (वय ३८, नागपूर), बसिम पठाण व निखिता चूडामन कुहिटे (वय २०, कावरापेठ) यांचा समावेश आहे. गंभीर जखमींना नागपूर येथील वैद्यकीय रुग्णालयामध्ये हलविले. या घटनेमुळे गांगापूर चौकात नागरिकांकडून अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या सुमोवर दगडफेक करण्यात आली. मात्र, आरसी फोर्समुळे वातावरण आटोक्‍यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com