उडीद, मूग डाळ महागली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

आयातीवर निर्बंध - प्रतिकिलो चार रुपयांची वाढ  

नागपूर - केंद्र सरकारने उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे एकाच दिवसात दोन्ही डाळीच्या दरात प्रतिकिलो चार ते पाच रुपयांची वाढ झाली. उडीद आणि मूग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आयात बंद झाल्यामुळे भाव आणखी वाढण्याचे संकेत आहेत. 

आयातीवर निर्बंध - प्रतिकिलो चार रुपयांची वाढ  

नागपूर - केंद्र सरकारने उडीद आणि मुगाच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे एकाच दिवसात दोन्ही डाळीच्या दरात प्रतिकिलो चार ते पाच रुपयांची वाढ झाली. उडीद आणि मूग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आयात बंद झाल्यामुळे भाव आणखी वाढण्याचे संकेत आहेत. 

मोदी सरकारने गेल्या दोन आठवड्यात तीन महत्त्वाचे निर्णय घेतले. तूर डाळीपाठोपाठ उडीद आणि मूग आयातीवर निर्बंध, आयातीत खाद्य तेलावरील आयात शुल्क ५ आणि ७ टक्‍क्‍यांहून १५ आणि २५ टक्के केले. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला चांगला भाव मिळेल. तूरडाळीची आयात बंद केल्याने तुरीचे दर चार हजार रुपये प्रति क्विंटलवर  पोहोचले आहेत, असे होलसेल ग्रेन ॲण्ड सीड्‌स मर्चंट असोसिएशनेचे सचिव प्रताप मोटवानी यांनी सांगितले. 

देशात तीस लाख क्विंटल मूग आणि उडदाची आयात होणार आहे. त्यानंतर आयातीवर प्रतिबंध लागणार आहेत. विद्यमान स्थितीत उडदाची आयात अधिक झालेली आहे. मुगाची आयात कमी आहे. मात्र, दोन्ही मिळून तीस लाख क्विंटल डाळीची आयात झालेली आहे. 

यंदा भारतात  डाळीचे उत्पादन १७० लाख टनावरून वाढून २२० लाख टन होण्याची शक्‍यता आहे. विदेशातून मोठ्या प्रमाणात झालेल्या आयातीमुळे देशातील डाळीच्या दरात घसरण झालेली आहे. गेल्यावर्षी तुरीचे हमीभाव ५०५०, मुगाचे ५१७५ आणि उडदाचे ५००० रुपये होते. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात डाळींचे उत्पादन केले. मात्र, बाजारात विपरीत परिस्थिती झाली तूर ३३०० ते ३६००, मूग ३५००-३८०० आणि उडीद ४००० ते ४२०० रुपयापर्यंत येऊन ठेपले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरकारने ३० लाख टन डाळीचा राखीव साठा केला आहे. सरकारने यंदा तुरीचे हमीभाव ५४५०,  मूग ५५७५, आणि उडीद ५४०० रुपये हमभाव निश्‍चित केले आहे. 

गेल्यावर्षी शेतकऱ्यांना डाळीचे भाव न मिळाल्याने निराश होते. त्यामुळे सरकारने प्रथम डाळीवर १० टक्के आयात शुल्क लावले. त्यानंतर साठा करण्याच्या निर्बंधावर प्रतिबंध हटविले. मात्र, शेतकऱ्यांना हमीभाव मिळतच नसल्याने गेल्या महिन्यात तूरडाळीवर आयातीवर निर्बंध घातले. परिणामी तूरडाळीच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झालेली आहे. हरभरा डाळीच्या दरातही प्रतिकिलो २ रुपयांची वाढ झालेली आहे, असेही मोटवानी म्हणाले.