उच्च दाबाच्या वाहिनीखाली अनधिकृत बांधकाम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

नागपूर - हिंगणा तालुक्‍यातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. इमारीच्या छतांवर संरक्षण भिंती नाहीत. छतावर गेल्यास सहजपणे वाहिनीला हात लागण्याचा धोका आहे. संयम पांडे याचा मृत्यू याच कारणामुळे झाल्याचे निदर्शनास येते. नीलडोह ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे संबंधित इमारतीचे बांधकाम नकाशा मंजुरीपूर्वीचे केल्याचे म्हणणे आहे. 

नागपूर - हिंगणा तालुक्‍यातील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. इमारीच्या छतांवर संरक्षण भिंती नाहीत. छतावर गेल्यास सहजपणे वाहिनीला हात लागण्याचा धोका आहे. संयम पांडे याचा मृत्यू याच कारणामुळे झाल्याचे निदर्शनास येते. नीलडोह ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे संबंधित इमारतीचे बांधकाम नकाशा मंजुरीपूर्वीचे केल्याचे म्हणणे आहे. 

संयम पांडे या बालकाचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. यामुळे  पुन्हा एकदा नीलडोहमधील अनधिकृत बांधकामांचा विषय ऐरणीवर आला आहे. मुकुंदा मांगे यांनी उमाळे यांच्याकडून १९८७ साली येथे भूखंड विकत घेतला होता. हिंगण्याचे तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी या भागात जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणत्याही प्रकारचे विकासकामे करता येणार नाही तसेच निवासी, सदनिका, व्यापारसंकुल, औद्योगिक व सार्वजनिक वापराकरिता बांधकामास परवानगी देऊ नये, असे ग्रामपंचायतीला आधीच कळवले होते.

असे असताना सदर जागेवर वीजपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. त्यानुसार वीजपुरवठा करण्यात आला. संबंधित भूखंडावरून  जाणारी ११ के.व्ही. उच्च दाब वीजवाहिनी ३५ ते४० वर्षांपूर्वीची आहे. या वाहिनीखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. या जागेवरील बांधकामाच्या छतावरून वीजवाहिनी गेली असल्यामुळे या वाहिनीच्या संपर्कात येऊन विजेच्या धक्‍क्‍याने संयम पांडे याचे निधन झाले. संयम पांडे याचे घर हॉटेल मुकुंदच्या एक घर सोडून आहे. दोन्ही घरांच्या गच्चीला संरक्षक भिंत ही नाही. मृत संयम पांडे आधी शेजारच्या घराच्या गच्चीवर गेला आणि गच्चीला संरक्षक भिंत नसल्याने त्याने हॉटेल मुकुंदच्या गच्चीवर उडी घेतली. त्या दरम्यान त्याचा स्पर्श वीजवाहिनीला झाला असावा व विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे ही वाहिनी भूमिगत करण्याचा प्रस्ताव मंजूर  झाला असून, मेट्रोतर्फे हे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

अखेर बिल्डर खोब्रागडेला अटक
जरीपटक्‍यातील संजय धर यांच्या जुळ्या मुलांचा शॉक लागून मृत्यू पावल्याप्रकरणी आरमोरर टाऊन सिटी इमारतीचे बांधकाम करणारे आनंद नारायण खोब्रागडे (वय ४६, नवा नकाशा) याला जरीपटका पोलिसांनी अटक केली. यासोबतच मनपाचे तत्कालीन नगररचना विभागाचे अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हे दाखल केले. गेल्या ३१ मे रोजी संजय धर यांची दोन्ही मुले पीयूष आणि प्रियांश हे कमाल चौक पाचपावलीतील रेसिडेन्सीत राहणाऱ्या मावशीकडे आले होते. सायंकाळी ते दोघेही क्रिकेट खेळत होते. त्यांचा चेंडूने इमारतीच्या शेजारी असलेल्या झाडावर अडकला. तो चेंडू काढण्यासाठी दोघांनीही लोखंडी रॉडचा वापर केला. त्यामुळे दोघांना विजेचा शॉक लागला. दोघेही जळाल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दहा दिवसांपूर्वी पीयूषचा मृत्यू झाला होता तर तीन दिवसांपूर्वी प्रियांशचाही मृत्यू झाला. सुगतनगरातील आरमोरर टाऊनशिप ही बिल्डर आनंद खोब्रागडे याने बनविली होती. त्यावेळी मनपाचे तत्कालीन नगररचना विभागाचे अधिकाऱ्यांनी इलेक्‍ट्रिक वायरचा धोका लक्षात असल्यानंतरही बिल्डरला इमारत बनविण्यास परवानगी दिली. त्यामुळे बिल्डरसह मनपाच्या नगररचना विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

एसएनडीएलकडे केली विचारणा
जरीपटका पोलिसांनी एसएनडीएललासुद्धा पत्राद्वारे विचारणा करून अनेक बाबींचा खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. घर बांधकामापूर्वी कोणकोणत्या परवान्यांची गरज आहे.  आपल्याकडून कोणत्या प्रकारची परवानगी घेणे आवश्‍यक आहे, बिल्डरने रीतसर तशी परवानगी घेतली आहे का? यासह अन्य बाबींचा खुलासा करण्यास सांगितल्याची माहिती आहे.