धरणात पाणी, मात्र शेतजमीन कोरडी

गोविंद हटवार
रविवार, 16 जुलै 2017

नागनदीच्या घाण पाण्याने गोसेखुर्द दूषित 

नागपूर - भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात दूषित पाण्याचा साठा दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे गरज असतानाही डाव्या कालव्यातून पाणी सोडले जात नसल्याने परिसरातील रोवणीची कामे खोळंबली आहेत. जनमंचच्या सिंचन शोध यात्रेत ही वास्तविकता दिसून आली.

नागनदीच्या घाण पाण्याने गोसेखुर्द दूषित 

नागपूर - भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात दूषित पाण्याचा साठा दिवसेंदिवस वाढत आहे, तर दुसरीकडे गरज असतानाही डाव्या कालव्यातून पाणी सोडले जात नसल्याने परिसरातील रोवणीची कामे खोळंबली आहेत. जनमंचच्या सिंचन शोध यात्रेत ही वास्तविकता दिसून आली.

गोसीखुर्द प्रकल्पाला २८ जून २०१५ रोजी जनमंच या सामाजिक संस्थेने भेट दिली होती. त्यानंतर प्रकल्पाच्या कामात काय सुधारणा झाली, हे तपासणे हा या शोध यात्रेचा हेतू होता. मात्र दोन वर्षांत प्रकल्पाच्या कामात फारसी सुधारणा झाली नसल्याचे अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. डावा कालवा २३ कि.मी.चा आहे. त्याची सिंचन क्षमता ४० हजार हेक्‍टर असताना फक्त १० हजार ६०० हेक्‍टरचा भाग विकसित करण्यात आला. २०२० पर्यंत पूर्ण भाग विकसित होईल, असे आश्‍वासन अधीक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर यांनी दिले. २००७ साली कालव्याचे बांधकाम झाले. त्यानंतर पहिल्या, दुसऱ्या वर्षी कालवा फुटला. कालव्याची भिंत सरकली. या कामाची चौकशी करण्यासाठी मेंढेगिरी समितीने अहवाल दिला. यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी आयटीआय गांधीनगर यांच्याकडे सल्ला मागण्यात आला.

त्यानंतर पुढील कामे संबंधित कंत्राटदारांकडूनच केली जाणार आहेत.  
या सिंचन शोध यात्रेत ॲड. अनिल किलोर, प्रमोद पांडे, मनोहर खोरगडे, शरद पाटील, ॲड. गोविंद भेंडारकर, राम आखरे, दादाराव झोडे, टी. बी. जगताप, दामोधर तिवाडे, रमेश बोरकर, अधीक्षक अभियंता (गोसी) जे. एम. शेख सहभागी होते. पाणीवाटप संस्था स्थापन कराव्यात
शेतकऱ्यांनी पाणीवाटप संस्था स्थापन केल्यानंतर पाण्याचे वाटप केले जाईल, असे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड यांनी बेलाटी येथील सभेत सांगितले. पाणी वेळेवर मिळत नाहीत, अशी शेतकऱ्यांची तक्रार होती. त्यावर झोड म्हणाले, पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी मोफत पाणीवाटप करण्यात आले. यापुढे दरवर्षी प्रतीहेक्‍टरी २४० रुपये पाणीपट्टी कर भरावा लागणार आहे. त्यासाठी आधी पाणीवाटप संस्थांची स्थापना करावी लागणार आहे.

दूषित पाण्याचा दुर्गंध
गोसीखुर्दमध्ये असलेले पाणी हे अतिशय दूषित आहे. नागपुरातील नाग नदीतील दूषित पाणी या धरणात येते. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील लोकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. आधी बैल धुणे, कपडे धुणे अशी कामे धरणातील पाण्यात करता येत होती. दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याने पाण्यात उतरण्याचे धाडस सहसा कोणी करत नाही. मासेमारीवरही याचा दुष्परिणाम झाला आहे.

कालव्याचे पाणी केव्हा मिळेल?
भंडारा जिल्ह्यातील सेंद्री येथील श्रीराम गायधने यांच्याकडे साडेतीन एकर जमीन होती. तीन एकर जमीन गोसीखुर्द प्रकल्पात गेल्यामुळे फक्त अर्धा एकर जमीन राहिली. ज्या कालव्यासाठी जमीन गेली त्याच कालव्याजवळ ते बसून होते. या कालव्यातून पाणी केव्हा येईल, याची वाट पाहत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती भावड, सोमनाडा आदी परिसरातील गावांतील शेतकऱ्यांची आहे.