विहिरी, बोअरवेलबाबत महापालिका झाली धृतराष्ट्र

राजेश प्रायकर
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणारे जलाशय कोरडे झाल्याने महापालिकेने पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी करण्याचे आवाहन केले आहे. शहरात पाणीकपातीबाबत महापालिका लवकरच धोरण ठरविणार आहे. शहरावरील जलसंकटाची तीव्रता कमी करण्याची क्षमता विहिरी आणि बोअरवेलमध्ये आहे. परंतु, मुबलक पाण्यामुळे महापालिकेनेच त्याकडे दुर्लक्ष केल्याने साडेसहाशे विहिरी दूषित झाल्या असून हजारांवर बोअरवेल बंद पडल्या आहेत. 

नागपूर - शहराला पाणीपुरवठा करणारे जलाशय कोरडे झाल्याने महापालिकेने पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी करण्याचे आवाहन केले आहे. शहरात पाणीकपातीबाबत महापालिका लवकरच धोरण ठरविणार आहे. शहरावरील जलसंकटाची तीव्रता कमी करण्याची क्षमता विहिरी आणि बोअरवेलमध्ये आहे. परंतु, मुबलक पाण्यामुळे महापालिकेनेच त्याकडे दुर्लक्ष केल्याने साडेसहाशे विहिरी दूषित झाल्या असून हजारांवर बोअरवेल बंद पडल्या आहेत. 

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कन्हान व पेंच नदीच्या पाणलोट क्षेत्रात यंदा अल्प पाऊस झाला. त्यामुळे यंदा पाणी संकटाची चाहूल महापालिकेला लागली असून नागरिकांना यापूर्वीच पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी करण्याचे आवाहन केले. जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे यांनी तर जानेवारीपासून शहरात पाणीकपातीशिवाय पर्याय नसल्याचेही स्पष्ट केले. येत्या काही दिवसांत महापालिका शहरातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या पाण्याबाबत आढावा घेणार असून, त्यानंतर पाणी देण्याची वेळही निश्‍चित केली जाणार आहे. मात्र, अद्याप शहरातील विहिरी व बोअरवेलबाबत महापालिका धृतराष्ट्रच बनल्याचे दिसून येत आहे.

शहरात अनेक मोठ्या विहिरी आहेत. याशिवाय महापालिकेनेच ठिकठिकाणी बोअरवेल तयार केल्या आहेत. मात्र, शहराला साडेसातशे एमएलडी पाणी मिळत असल्याने महापालिकेने या विहिरींकडे तसेच बोअरवेलकडे जणू कधी त्याचे कामच पडणार नाही, असेच धोरण अवलंबविले. मुबलक पाण्याच्या आनंदोत्सवात शहरातील ६४० विहिरींचा तसेच ४ हजार ९८१ बोअरवेलचा महापालिकेला विसर पडला. मात्र, यंदा निसर्गानेच पाण्याबाबत महापालिकेला धडा शिकविला. ६४० पैकी निम्म्या विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. तर, निम्म्या विहिरींच्या पाण्याचे नियोजनच महापालिकेकडे नसल्याने त्याही दूषित होण्याच्या मार्गावर आहेत. ४ हजार ९८१ बोअरवेल असून यातील हजारावर बोअरवेल बंद आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आता व्यक्त केली जात आहे. 

..तर नागपूरकरांना मोठा दिलासा 
दूषित झालेल्या विहिरींचा उपसा करून त्यावर पंप बसवून नागरिकांना येथील पाणी धुणीभांडी, झाडे, उद्यानांमध्ये वापरासाठी उपलब्ध होऊ शकते. शहरातील अनेक भागांतील हजारावर बंद बोअरवेल दुरुस्ती केल्यास, विशेषतः शहर सीमेवरील वस्त्यांना यातून दिलासा मिळण्याची  शक्‍यता आहे. महापालिकेने इच्छाशक्ती दाखविल्यास नागरिकांना पाणी कपातीच्या काळातही  मोठा दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

पदाधिकारी, अधिकाऱ्यांमुळे पाणी दूषित 
नागरिकांना २४ तास पाणी देऊन त्यांच्याकडून पाणीकरस्वरूपात मोठ्या प्रमाणात वसुली करण्याच्या हव्यासापोटी महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनीही शहरातील विहिरी व बोअरवेलकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अधिकारी व सत्ताधाऱ्यांच्या याच हव्यासापोटी चांगल्या विहिरी दूषित झाल्या तर बोअरवेल बंद पडल्या असून आता त्या दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news well boarwell water