प्रसूत मातेसह चिमुकल्याचाही मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अतिदक्षता विभागात भरती असलेल्या प्रसूत महिलेसह तिच्या नवजात चिमुकल्याचाही मृत्यू झाला आहे. महिलेस स्वाईन फ्लू असल्याचे निदान झाले होते. मेडिकलमध्ये निवासी डॉक्‍टरांचा संप सुरू आहे. त्यातच रविवारी सुटी असल्यामुळे वरिष्ठ डॉक्‍टरांनी रुग्णसेवेकडे पाठ फिरवली. याचा फटका रुग्णांना बसला असून २४ तासांत मेडिकलमध्ये १० मृत्यू झाले आहेत.

मेडिकलमध्ये निवासी डॉक्‍टरांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले. बाह्यरुग्ण विभाग बंद असल्याने रविवारी सर्वाधिक गर्दी कॅज्युअल्टीमध्ये असते. जखमी अवस्थेत आलेल्या मेडिकलमधील  कॅज्युअल्टीत वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला. याशिवाय अतिदक्षता विभागात स्वाइन फ्लू बाधित गर्भवती महिला भरती होती. या महिलेकडे उपचारात हलगर्जीपणा दाखविण्यात आल्यामुळे मृत्यू झाल्याची चर्चा वॉर्डासमोरच रंगली आहे. दरम्यान, येथील दारासमोर कोणीही सुरक्षारक्षक नसल्यामुळे परिचारिकांनी वॉर्डाला आतून कुलूप लावले आहे.

एका महिलेच्या डोक्‍यात ताप शिरल्याने ती उपचारासाठी आली. परंतु तिला वेळेवर उपचार मिळाले नाही. डोक्‍यात ताप शिरल्यामुळे अखेर या महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अशाप्रकारे मेडिकलमध्ये २४ तासांत १० मृत्यू झाले.

अधिष्ठात्‍यांचा सकाळी राऊंड
निवासी डॉक्‍टरांचा संप सुरू आहे. डॉ. राज गजभिये, डॉ. सी. एम. बोकडे यांच्यासह काही निवडक वरिष्ठ डॉक्‍टर मेडिकलमध्ये झळकले. तर मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी सकाळीच मेडिकलमध्ये राऊंड घेतला. राऊंड घेत असताना अनेकांना सूचना देण्याचा प्रयत्न केला. डॉ. मुरारी सिंग यांच्यासह निवडक डॉक्‍टर उपस्थित होते. तर परिसरात ॲप्रॉनवर इंटर्नस्‌ झळकत होते.